नाटकाचा तास बनवतोय खास…देवदत्त पाठक यांचे १९८८ पासूनचे संशोधन!

देवदत्त पाठक
ज्येष्ठ रंगभूमी कला तज्ञ

आजच्या जलद गतीने बदललेल्या युगामध्ये नाटक कला मात्र स्वतःचं अस्तित्व अतिशय समर्थपणे आपले अस्तित्व टिकवून आहे. आपल्या समोर प्रत्यक्ष कोणीतरी वागते, अभिनेते बोलतात, चालतात आणि हालचाली करतात हे बघण्याचं दुर्मिळ भाग्य महाराष्ट्रासारख्या रंगभूमी कलेच्या परंपरेला असामान्य करणारे आहे.

नाटक वागायला शिकवतं, अशी विचारधारा ठेवून नाटकातलं वागणं, जसं अचूक असणे गरजेचे आहे, तसेच दैनंदिन जगण्यातलं एकमेकांबरोबरच वागणं अचूक असल्यास, कोणाचेही आयुष्य आनंदी होईल ,या विचाराने प्राध्यापक ते देवदत्त पाठक १९८८पासून ‘शाळेच्या अभ्यासक्रमात नाटकाचा तास’ (आता, त्याचे पेटंटही झालेले आहे) अशा प्रकारचा सजीवकलेचाअनोखा संशोधनात्मक उपक्रम घेत आहेत, या उपक्रमात नाटक करणे, अभिनय करणे याची समस्त मुलांना समज येतेच ,पण त्याचबरोबर आपण एकमेकांना समजून घेऊन ,सकारात्मक भावनेने, एकमेकांशी दुरुस्त वागण्यासाठी नाटकाचा तास संकल्पना १९८८ पासून उपयोगात येत आहे. गेल्या ३८ वर्षांमध्ये लाखो विद्यार्थ्यांनी या नाटकाच्या तासाचा अनुभव घेतलेला आहे, आणि त्यातून आपले दैनंदिन जगणे ,कसे आनंददायी करता येईल ,या दृष्टीने त्यांच्या मनात नाटकाचा तास आयुष्यभरासाठी स्मरणात राहतो आहे व त्याचा रोजच्या जगण्यामध्ये उपयोग पण होत आहे असे हजारो विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. लहान मुलं अत्यंत कच्ची आणि सच्ची ही असतात, त्याचबरोबर लवचिकही असतात , त्यांच्या मनावरती , आपल्या कोऱ्या पाटीवर योग्य तो तंदुरुस्त वागण्याचा संस्कार होण्यासाठी प्रा. देवदत्त पाठक यांची ही अनोखी संकल्पना उपयोगात येत आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची मुलं त्यांच्याकडून नाटकाच्या तासाच्या अंतर्गत रंगमंचीय खेळ ,अर्थात (थेटर गेम्स) खेळायला लावून रंगभूमी पाठाचा अर्थात ( थिएटर एक्सरसाइजचा) अनुभव घेत ,मुले आपला विचार कल्पना आणि कृती शक्ती याचा वापर करण्यासाठी अधिक हुशार होत आहेत .

वय वर्ष ‘पहिली ते दहावी’ या विविध वयोगटातील आणि मानसिक, बौद्धिक, शारीरिक स्थिती बदलत जाणाऱ्या मुलांचा हा एक अर्थाने नवीन संक्रमणाचा काळ असतो, अशा काळात शालेय अभ्यासाबरोबर वागण्याचा अभ्यास जर का अचूक घडला , तर मुलं स्वतःचं आयुष्य ,त्यामध्ये येणारे प्रश्न अडचणी यावरती स्वतः सामोरे जातील आणि त्यातून स्वतःचं करिअर वेगवेगळ्या विषयांमध्ये सखोल घडवतील ,असा विश्वास असल्याने प्रा. देवदत्त पाठव यांनी १९८७ पासून या ‘शाळेच्या अभ्यासक्रमात नाटकाचा तास’ या अनोख्या संकल्पनेला सुरुवात केली .शालेय रंगभूमीचे एक नवे स्वरुप आणि त्याच्या अनुषंगाने विषय आशय आणि मुलांचे भाव विश्व यांच्याशी निगडित काही नाट्यकृतीही या निमित्ताने करण्यात येत आहेत, सरांनी लिहिलेल्या नाटकांची संख्या जवळजवळ १७२ आहे , हा एका अर्थाने शालेय रंगभूमीवरचा एक वेगळा उपक्रमांनी विक्रमच म्हणायला हवा.

वागणे शोधता शोधता माणूस आपल्या विचारांना,भावनांनाही ,एक अर्थाने घडवत असतो आणि हे घडवणे नाटकातील दोन पात्रांच्या नात्यांमधले घडत असते आणि हेच नातेसंबंध अधिक हुशारीने जे नाटकातून मांडले जातात कृतीतून केले जातात , तेच रोजच्या जगण्यामध्ये कुठल्या प्रकारचा जास्त फाजील आत्मविश्वास न ठेवता, प्रत्येक गोष्टीला नेमके, समतोल ,अचूक साजरे करण्यासाठी मुलांना हा नाटकाचा तास उपयोगी पडतो आहे ,असे या निमित्ताने देवदत्त पाठक यांनी संशोधन केलेले आहे, त्यासाठी जवळजवळ २००० रंगमंचीय खेळांची त्यांनी निर्मिती केलेली आहे.

शाळा भरल्यावर कधी एकदा नाटकाचा तास सुरू होतो ,आणि आम्ही एकमेकांशी सुसंवादी रूपात साद -प्रतिसाद ,ओळखत एकमेकांच्या क्षमता समजून घेऊन ,एकमेकांच्या मनाचा विचार करत रंगमंचीय खेळ खेळतो नि रंगभूमी पाठातून नव्या विषयांना सामोरे जातो आणि प्रत्यक्ष कृतीतून सर्वांसमोर धारिष्ट्याने काही कलात्मक कृती सादर करतो, यासाठी मुलं वाट बघत असतात .गेल्या ३८ वर्षांच्या या प्रवासात याची झालेली सुरुवात फारशी आशादायक नव्हती, मुलांना नाटक्या करण्यापेक्षा मुलांना अभ्यास करणारा हो,असा संस्कार हवा ,यासाठी नाटकाला पूर्णपणे बंद दार दाखवणारे अनेक महाभाग आणि शाळेचे संचालक आणि शिक्षक भेटले, पण गुंड प्रवृत्तीच्या, दंगा करणाऱ्या मुलांच्या बाबतीत झालेला अमुलाग्र बदल बघून अशा प्रकारच्या शिक्षण संस्थांचे चालक व शिक्षक यांनीही तोंडात बोटे घातली आणि हो नाही करता करता या गोष्टीला मान्यता देऊन ,नाटकाचा तास शाळेमध्ये सुरू केला.

जिथे जिथे मूल आहे तिथे तिथे नाटकाचा तास हा वर्तन दुरुस्तीसाठी पोचलाच पाहिजे या भूमिकेतून आजपर्यंत देवदत्त पाठक यांनी ३८० शाळांपर्यंत असा उपक्रम पोचवलेला आहे. यामध्ये रस्त्यावरची मुले, मतिमंद, गतिमंद, अंध, मूकबधिर,ऑटिस्टिक झोपडपट्टीतली मुलं ,तसेच सर्वसामान्य शाळा ते हाय प्रोफाईल इंटरनॅशनल स्कूलपर्यंत अशा प्रकारचा हा संशोधनात्मक नाटकाचा तास पोहोचलेला आहे.

नाटकाचा तास जेव्हा जेव्हा मुलांच्या आयुष्यात येतो ,त्याच वेळेला मुलं आपल्यामध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत आणि काय चुकीच्या गोष्टी आहेत याची जाणीव करून घेत ,एकमेकांबरोबर सहोदर वागण्याची कृती ,शोधत राहतात. नाटकाच्या तासाची सुरुवात एखाद्या रंगमंचीय खेळापासून होते, ज्यामध्ये विचार ,कल्पना ,स्मरण ,निरीक्षण कृती या क्षमतांना विकसित केले जाते आणि मग त्याचा वापर आपल्या दैनंदिन जगण्यामध्ये कसा करावा ,ज्याच्याशी नैतिक मूल्यांचा थेट संबंध आहे ,अशा ही खेळातून मुलं स्वतःला स्वतःच्या व्यक्तिमत्वाला शोधत आकार देत राहतात ,त्यानंतर होणारा थिएटर एक्सरसाइज म्हणजेच रंगभूमी पाठ हा मुलांना एकत्रित काम कसे करावे, एकमेकांना सांभाळून कसे घ्यावे, एकमेकांच्या विचारांचा आदर कसा करावा, यासाठी उपयोगी पडतो , तासाच्या शेवटी प्रत्येक मुलाला आपले मन ,बुद्धी ,आणि शरीर वापरून ते कलात्मक पद्धतीने कसे सर्वांसमोर मांडावे याची छान संधी मिळते .यातूनच मुलांमधली साद प्रतिसाद सकारात्मक प्रक्रिया चालू राहते आणि अवघ्या शाळेचे अस्तित्वच बदलून जाते , सुसंवादी होते,दंगेखोर मुले सुद्धा आपणही छान राहू शकतो ,वागू शकतो या विश्वासाच्या जोरावर शाळेमध्ये सर्वांबरोबर राहतात , हा या नाटकाच्या तासाचा वेगळेपणा आहे .नाटकाच्या तासाची तोंडी परीक्षा ही घेतली जाते, यामध्ये नैतिक मूल्यांच्या आधारे खेळल्या गेलेल्या रंगमंच खेळांच्या बाबतीत विचारणा होते, तसेच तुझ्याकडे कुठल्या कुठल्या क्षमता आहेत याची प्रश्नातून विचारणा होते , त्याची उत्तरे मुलं तोंडी पण देतात लेखी परीक्षेमध्ये मुलांना नाटकाच्या तासाचे आपल्या आयुष्यातलं महत्त्व काय ? असा सवाल करून अंतर्मुख व्हायला मदत होते आणि मग मुले नाटकाच्या तासातून सहजपणे मला आनंद मिळतो ,मला दुसऱ्याचा विचार करायची जाणीव होते, तसंच एकमेकांना सांभाळून घेऊन काम करायचे आहे अशा प्रकारची उत्तरे देऊन मुले लेखी परीक्षेत सुद्धा बाजी मारतात आणि प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये मुलं स्वतःच्या अडचणी, आजूबाजूच्या मुलांचे असलेले प्रश्न ,तसंच मुलांच्या अनुभव विश्वाशी असलेल्या अडचणींवर विचार करून प्रात्यक्षिक प्रयोगामध्ये त्याचे सर्वांसमोर धिटाईने सादरीकरण करतात .

एकीकडे क्षमता विकसित करत ,मुलं मग वर्षाच्या शेवटी १२० तासानंतर प्रत्यक्ष छोटीशी नाट्यकलाकृती सादर करतात .शिक्षक पालक आणि शाळेतील इतर मुले यांचे मन जिंकतात. नाटकाचा तास हा नाटक करणे याचे महत्त्व देतोच, पण त्याचबरोबर तो एक वर्तनाचा वेद आहे आणि तो सगळ्यांनी अभ्यासायला हवा, त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे अशा दृष्टीने उपयोगात येत आहे .गेल्या ३८ वर्षांचे फलित म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक मुलांनी बाजी मारलेली आहे ,त्यामध्ये इंजिनिअर, डॉक्टर, वकील, उद्योगपती ,कलाकार ,लेखक समाजसेवक असे कितीतरी विद्यार्थी कार्यरत आहेत .

समाज घडवणे म्हणजे फक्त फक्त सोयीसुविधा देणे नाही ,तर त्यांच्या म्हणजेच मुलांच्या मनावर उत्तम वागण्याचा संस्कार घडवणे आणि यातून समाजातील तेढ त्रास कमी करता येईल ,या दृष्टीने नाटकाचा तास सगळ्यांनाच बनवतो खास ,असे देवदत्त पाठक यांचे संशोधन आजच्या डीटीएच वर्ल्डच्या काळातील महत्त्वाची गरज आहे .