मुंबई: भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यानिधी शैक्षणिक संकुल, जुहू येथील मराठी माध्यम विद्यालय हायस्कूल, कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालय व कनिष्ठ व्यावसायिक महाविद्यालयाच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. समाजसेवेची जवळपास ३० वर्षांची परंपरा या शिबिराद्वारे पुन्हा एकदा जपण्यात आली. या शिबिराला पावारिका कंपनीचे उपाध्यक्ष शशी सोनार, नगरसेवक दीपक कोटेकर, जुहू एरोबिक्स समन्वयक उषा पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री, सचिव साधना मोढ आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात ७३ रक्तदात्यांनी नोंदणी केली होती. रक्तदान शिबिरातून ६० रक्ताच्या पिशव्या संकलित करण्यात आल्या. प्रत्येक दात्याची आरोग्य तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कूपर रुग्णालयाच्या रक्तपेढी आणि डॉ. जितेन भावसार यांच्या सहकार्याने शिबिर पार पडले.
तसेच रोटरी क्लब ऑफ जुहू एलिगन्सच्या सहकार्याने समाजसेवक मधुकुमार राठी यांच्या समन्वयातून अन्नदानाचे आयोजन करण्यात आले. तसेच रुतुंबरा गायत्री मंडळाच्या गीता जोशी, ममता शहा व गौरी कारकरे यांनी संगीता तिवारी यांच्या समन्वयाने रक्तदानासाठी विशेष पुढाकार घेतला. यासाठी विद्यानिधीचे पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी व स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून एका दात्यामुळे तीन जीव वाचतात हा संदेश यावेळी देण्यात आला. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल व्यवस्थापनाने सर्व स्वयंसेवकांचे, दात्यांचे व सहयोगी संस्थांचे आभार मानले आणि अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव व देशभक्तीची भावना दृढ होते असे मत व्यक्त केले.