कविता डॉट कॉम परिवाराची सिध्दगडला भेट, कवि संमेलन

कल्याण: शिवतुतारी प्रतिष्ठान संचालित कविता डॉट कॉम परिवारातर्फे १६ ऑगस्टला हुतात्मा विठ्ठल लक्ष्मण कोतवाल व हुतात्मा हिराजी गोमाजी कोतवाल यांना वीरमरण आले त्या सिध्दगड परिसराला भेट देण्यात आली. यावेळी तिथे उभारण्यात आलेल्या या हुतात्म्यांच्या समाधीस्थळाला वंदन करण्यात आले. भिमाशंकर वनक्षेत्र परिसरात येणाऱ्या या जागी विविध भागातून पर्यटक आल्याचे पाहायला मिळाले.

यानंतर तिथे असणाऱ्या जलप्रपाताखाली भिजण्याचा आनंद कविता डॉट कॉम सदस्यांनी घेतला. श्रावण मासास प्रारंभ झाल्याने हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला व श्रावणसरींनी सजलेला असल्याचे दिसून आले. तेथून जवळच असलेल्या म्हसा – चिरड या गावातील एम के रिसॉर्ट येथे कविता डॉट कॉम परिवारातर्फे कविसंमेलन सादर करण्यात आले. यावेळी बालकवि प्रसाद माळी, स्पंदन गोपाळे, सारंग पाटील तसेच रुद्राक्ष पातारे, अंकिता गोळे, स्वाती शिवशरण, शंकर गोपाळे, नारायण लांडगे, दादा पडळकर यांनी एकाहुन एक भावपूर्ण कविता सादर केल्या. एम के रिसॉर्टच्या तनुजा महेश कंटे यांना वर्ष २०२४ चा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते अलिकडेच देण्यात आल्यानिमित्त त्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. सदर रिसॉर्टमधील जलतरण तलाव, सुंदर वनराई, घरचे चुलीवरचे जेवण, विविध उपयुवत वनस्पती यामुळे कविता डॉट कॉम परिवारातील सदस्यांनी आनंद व्यक्त केला. सदर सहलीच्या आयोजनासाठी कविता डॉट कॉमचे निर्मीती सूत्रधार प्रा. रविंद्र पाटील तसेच अमोल वाघमारे, मनोहर पाटील, दिनेश मेढेकर, स्वाती शिवशरण, रंजना साखरे, कल्पना देशमुख, हेमंत शिवशरण, संगीता काळभोर, नेहा माळी आदिंनी परिश्रम घेतले.