‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेतून दारूबंदीचा लढा !

मनोरंजनासोबतच प्रबोधनही गरजेचं!

मुंबई:मनोरंजनाच्या माध्यमातून समाजातील महत्त्वाचे प्रश्न प्रेक्षकांसमोर मांडले जातात, तेव्हा त्या कथेला एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वास्तवाची जाणीव करून देतानाच, त्यावर उपाय शोधण्याची प्रेरणाही अशा कथांमधून मिळते. ‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका अशाच एका महत्त्वाच्या सामाजिक विषयाकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. दारूच्या व्यसनामुळे देशभरात अनेक संसार उद्ध्वस्त होतात. दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेला घरचा कर्ता पुरुष स्वतःच्याच बायकोला, आईला, बहिणीला त्रास देऊ लागतो. व्यसनामुळे घरात सतत आर्थिक तंगी सुरू होते. मुलांचं शिक्षण रखडतं, घरातले वाद वाढतात आणि कुटुंबातील वातावरण बिघडत जातं. हळूहळू समाजात, चारचौघांत तोंड दाखवणंही कठीण होऊन जातं. या सगळ्याचा सर्वाधिक परिणाम घरातील स्त्रीला सहन करावा लागतो.

हे केवळ मालिका आणि चित्रपटांमध्ये दाखवलं जात नाही, तर भारतभरातल्या अनेक कुटुंबांची ही वास्तविकता आहे. मात्र, केवळ असं घडतंय म्हणून पाहत राहण्यात अर्थ नाही; त्यावर ठोस उपायही हवा. देशभरातल्या अनेक गावांमध्ये महिलांनी एकत्र येऊन दारूबंदीचा लढा उभारला आहे. ज्या गावांमध्ये दारूच्या अतिरेकामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले, तिथल्या स्त्रिया एकत्र आल्या आणि त्यांनी आपल्या कुटुंबासाठी तसेच संपूर्ण गावासाठी हा लढा उभा केला. अशा अनेक यशस्वी उदाहरणांमधून महिलांची एकजूट आणि त्यांची ताकद दिसून येते. त्या नवऱ्यालाही व्यसनातून बाहेर काढू शकतात, संसार सावरू शकतात आणि गावात दारूबंदीही करू शकतात. ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेतही हाच महत्त्वाचा सामाजिक विषय मांडला जात आहे. कृष्णाई आणि तिच्या लेकी गावात दारूबंदी व्हावी यासाठी एकत्र येऊन लढा उभारताना दिसणार आहेत. मात्र, त्यांच्या या लढ्याला यश मिळणार का? त्यांच्या प्रयत्नांवर कपट आणि खोटेपणा मात करणार की त्यांच्या एकजुटीचा विजय होणार? हे प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे.

हा केवळ मालिकेतील एक प्रसंग किंवा कथानकाचा भाग नाही, तर आपल्या समाजासमोर असलेला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. गावागावातल्या अनेक महिलांना या कथेतून आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी उभं राहण्याचं बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे.

बघायला विसरू नका ‘कृष्णाईच्या लेकी’, दररोज संध्याकाळी ७:०० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *