‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ उत्तर मुंबई भाजपच्या पत्रकार परिषदेत आमदार अतुल भातखळकर यांचे विरोधकांवर टीकास्त्र

मुंबई: सध्या देशात विरोधी पक्षामार्फत सुरू असलेला अपप्रचार आणि पंतप्रधानांपासून प्रत्येक संवैधानिक संस्थेवर बिनबुडाचे आरोप ते थेट खालच्या पातळीवर अपशब्द वापरल्याबाबत भारतीय जनता पक्षाने विशाल पदयात्रा (रॅली) आणि पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. उत्तर मुंबई भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत आज आमदार अतुल भातखळकर यांनी विरोधी पक्षावर प्रहार केले.

उत्तर मुंबई लोक कल्याण कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार अतुल भातखळकर, भाजप जिल्हाध्यक्ष नगरसेवक दिपक (बाळा) तावडे , आमदार मनिषा चौधरी, प्रसिद्धी प्रमुख नीला बेन सोनी राठोड, सरचिटणीस रश्मिकांत बेलवलकर उपस्थित होते.

आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले की, ‘२०१४, २०१९ आणि २०२४ तीन वेळा लोकसभेत काँग्रेस आणि मित्रपक्षांचा पराभव झाला, यासाठी काँग्रेसने आत्मचिंतन केले पाहिजे. निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागताना विरोधी पक्षाने विचार केला पाहिजे की निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार नव्हतेच. राहुल गांधी यांनी जर निवडणूक खोट्या पद्धतीने झाल्याचे आरोप केले आहे, तर सर्वात पहिला त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा. राहुल गांधी लोकसभा चालू देत नाही आणि दुसऱ्या बाजूला मोक पार्लमेंटचे आयोजन करून काय सिद्ध करतात?’

देशाच्या संवैधानिक संस्थावरील आरोपामागे मात्र राहुल गांधी नसून हे एक मोठे षडयंत्र आहे आणि देशाच्या बाहेरचे शत्रूंचे यामागे समर्थन असल्याचे आमदार अतुल भातखळकर यांनी नमूद केले.

‘जागतिक बँकेने सांगितल्याप्रमाणे भारताची गरिबी ५६% ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षाचा कार्यकाळात कमी झाली आहे. भारत आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकासपथावर गतिमान आहे. अशावेळी सत्तेतून बाहेर राहिलेला विरोधी पक्ष आणि राहुल गांधी आणि मंडळी सैरभैर झाली असून दिवस रात्र खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहे.खोटे नरेटिव पसरवून देशाची शांतता बिघडवणे आणि त्यासाठी आंदोलन करून लोकांमध्ये भ्रम करण्याचे दुष्कृत्य करत आहे. त्याचे सडेतोड उत्तर नागरिक आणि मतदाराने विशाल पदयात्रा (रॅली) काढून दिले आहे. अशा कारणाने राहुल गांधी आणि काँग्रेसला जनता आशीर्वाद देत नाही,’ असेही आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.