जुहूच्या विद्यानिधी विद्यालयात आकाश दर्शनाचा कार्यक्रम!

मुंबई: मुंबई उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी मराठी माध्यमिक विभागामध्ये आकाश दर्शनाचा कार्यक्रम झाला. विद्यार्थी आणि शिक्षकांना यावेळेस दुर्बिणीतून गुरु ग्रह त्याचे उपग्रह सप्तर्षी तारका समूह अगस्ती तारका समूह व्याध तारा या अवकाशीय वस्तूंचे प्रत्यक्ष निरीक्षण करता आले. दिलेल्या माहितीवर प्रश्नमंजुषा घेऊन कार्यक्रमाची रंजकता अजून वाढवली गेली. आजच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत अनुभवातून शिक्षण या संकल्पनेचा जिवंत नमुना या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षकांना अनुभवायला मिळाला.

खगोल मंडळ सायन यांच्या मिलिंद काळे ,महेंद्र मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या मदतीने हा कार्यक्रम सादर करण्यात आला. अवकाशाची रंजक सफर या वेळेला विद्यार्थी व शिक्षकांनी खगोल मंडळाच्या तज्ञांच्या मदतीने केली. या कार्यक्रमासाठी दिलीप साहू, अनिल भंडारी आणि मधूकुमार राठी यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. यावेळी मालव मेहता व त्यांच्या सहकारी रूपल मेहता, विनय मेहता, तेजस मेहता उपस्थित होते.