डाेंबिवली:गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला डाेंबिवली येथे पारंपारिक मराठमाेळ्या वेशभूषेतून पिकलबाॅलच्या प्रसारासाठीची उंच गुढी उभारण्यात आली. बेलग्रेव्ह स्टेडियममध्ये पिकलबाॅलचा प्रदर्शनीय सामने आयाेजित करण्यात आले.डाेंबिवलीमध्ये मराठमाेळ्या वेशभूषेत वृद्ध आणि महिला व पुरुषांच्या सहभागातून आयाेजित हा पिकलबाॅलचा सामना लक्षवेधी ठरला. यादरम्यान खास ठाणे येथून आलेल्या देशपांडे दांम्पत्यांचा सहभागही काैतुकास्पद ठरला.
सध्या पिकलबाॅल खेळाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामुळे पिकलबॉल हा एक रॅकेट किंवा पॅडल स्पोर्ट आहे ज्यामध्ये दोन खेळाडू (एकेरी) किंवा चार खेळाडू (दुहेरी) जाळीवर पॅडलसह छिद्रित, पोकळ प्लास्टिक बॉल मारतात. पिकलबॉल घरामध्ये आणि बाहेर खेळला जातो. याच्या प्रसार आणि प्रचारासाठी सध्या विविध याेजना आखल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून निलीमा उदगिरकर यांच्या पुढाकाराने डाेंबिवलीतील बेलग्रेव्ह स्टेडियममध्ये पिकलबाॅलचे आयाेजन करण्यात आले.पिकल बॉल आणि पाडवा संयुक्त समारंभ गुढीपाडव्याच्या निमित्ताने डोंबिवलीत एक आगळावेगळा समारंभ साजरा झाला.
पिकल बॉल हा सध्या प्रचलित झालेला खेळ पारंपरिक वेशात खेळण्याचा देशातील एकमेव आणि प्रथमच असावा, यासाठी आयोजित केलेल्या समारंभात ५० पेक्षा अधिक लाेकांनी सहभाग नाेंदवला हाेता. यामध्ये गुढी पाडव्याच्या पुर्वसंध्येला मराठमाेळी वेशभूषा करून सर्वजण सहभागी झाले. यात नऊवारी साड्या नथी साज शृंगार परिधान करून स्त्री खेळाडू आणि कुर्ता पायजमा घालून पुरुष खेळाडू खेळत होते.
डोंबिवलीमधील हे पिकल बॉल स्टेडियम मुंबईमधील फार थोड्या स्टेडियममध्ये गणले जाते. अंबरनाथ ते ठाणे या भागातून येथे हौशी खेळाडू खेळतात. ठाण्याहून येणारे अजय आणि सुनीता देशपांडे दाम्पत्य यांचा सहभाग लक्षवेधी ठरला. तसेच पॅराग्लाइडिंग करताना पाय तुटलेले उदगीकर, लहान थोर स्त्री पुरुष सहभागी झाले. गुढीपाडवा परंपरा साजरा करणारी प्रथा डोंबिवलीत पुरातन आहे, पण पिकलबॉलचा प्रचार गुढीपाडव्याच्या निमित्ताने हा प्रयोग खरोखरच अभिनव आणि मनोवेधक होता.