मुंबईच्या पवई तलावातील जलपर्णी दूर करण्यासाठी सगुणा जलसंवर्धन तंत्र !

सगुणा जलसंवर्धन तंत्राद्वारे उल्हास नदी आणि औरंगाबादच्या सलीम अली येथील तलावाचे जलशुद्धीकरणही करण्यात आलं आहे. ‘पाण्याचे साठे खराब आणि प्रदूषित होत असून ते मृत होण्याच्या मार्गावर आहेत. त्या पाण्याच्या साठ्यांचे पुनरुज्जीवन करून त्यांना समाजाच्या उपयोगासाठी आणण्याचा उद्देश सगुणा जलसंवर्धन तंत्राचा आहे.

मुंबई : मुंबईतील प्रमुख तलावापैकी एक असलेला पवई तलाव. सगुणा जलसंवर्धन तंत्राच्या माध्यमातून  पवई तलावातील जलपर्णी मुक्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सगुणा रुरल फाऊंडेशनच्या ‘सगुणा जलसंवर्धन तंत्रा’द्वारे पवई तलावात ५ विविध जातीचे १ लाख मासे सोडण्यात आले आहेत. हे मासे जलपर्णीचे हिरवे तण आणि वनस्पती  खातात. तसेच गाळ ढवळणे आणि पाण्याचे शुद्धीकरणाचे कामही करतात. पवई तलावातील १० एकर क्षेत्रातील भागात जलपर्णी मुक्त करण्याचं काम सगुणा जलसंवर्धन तंत्राद्वारे  सुरु आहे. पवई तलावाचे पाणलोट क्षेत्र हे ६.६१ चौरस किलोमीटर आहे. तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे २.२३ चौरस किलोमीटर आहे. सगुणा जलसंवर्धन तंत्राद्वारे उल्हास नदी आणि औरंगाबादच्या सलीम अली येथील तलावाचे जलशुद्धीकरणही करण्यात आलं आहे. ‘पाण्याचे साठे खराब आणि प्रदूषित होत असून ते मृत होण्याच्या मार्गावर आहेत. त्या पाण्याच्या साठ्यांचे पुनरुज्जीवन करून त्यांना समाजाच्या उपयोगासाठी आणण्याचा उद्देश सगुणा जलसंवर्धन तंत्राचा आहे.’ 

‘पाणीसाठ्यावर सर्वदूर आक्रमक तण वाढताना दिसत आहे, त्याला जलपर्णी म्हणतात. जलपर्णी प्राणवायू विरघळणे आणि पाण्यावर सूर्यप्रकाश खोलवर पोहचवणे याला थांबवते. त्यामुळे पाणीसाठा मृत होतो. हा प्रश्न भारतभर आणि जगभर असून अजून त्याला शाश्वत उत्तर मिळालं नाही. या आक्रमक वनस्पतीला थांबवणारं सगुणा जलसंवर्धन तंत्र विकसित झाले आहे. त्यामध्ये या तणांवर अंतरप्रवाही सर्वसाधारण तणनाशक फवारणे आणि निरनिराळ्या जातीच्या माशांची पिले सोडणे याचा अंतर्भाव आहे. तणनाशकाच्या फवारणी आधी पाण्यात पाच प्रकारचे मासे सोडले जातात. गवत्या मासे जे मोठे होताना पाण्यातील सर्व वनस्पती खातात. कटला आणि सिल्वर मासे अशा मोकळ्या झालेल्या पाण्यामध्ये वाढणारी एकपेशीय शैवाळ खाऊन संपवतात. रोहू आणि सिप्रेनस मासे हे पाणी साठ्याच्या तळातील गाळ ढवळून काही भाग खाऊन तेथील भाग स्वच्छ  करतात,’ असे सगुणा रुरल फाऊंडेशनचे संचालक चंद्रशेखर भडसावळे यांनी सांगितले.