सामाजिक बांधिलकीने दुर्लक्षित वंचितांना आरोग्याचे समुपदेशन ! – डॉ. दीपा बंडगर

आदिवासी समाजातील कुटुंबांना आरोग्याच्या हक्काची जाणीव करून देत डॉ. दीपा बंडगर यांनी १२ वर्षे जनजागृती करत वंचित लोकांमध्ये बदल घडवले. ४ शाळांमधील २२ मुलांच्या शिक्षणाचा खर्चही डॉ. दीपा बंडगर यांनी उचलला आहे. आपण सर्व समान आहोत या नात्याने त्यांनी ५,००० पेक्षा अधिक लोकांचे आरोग्यविषयक समुपदेशन केले आहे. आदिवासी वंचित आणि दुर्लक्षित समाजात आरोग्यविषयक जनजागृतीचे आणि प्रत्यक्ष वैद्यकीय सेवा देण्याचे सेवाकार्य डॉ. दीपा बंडगर करीत आहेत.

जिथे स्त्री मनाचे अस्तित्व नाकारले जाते, तिथे स्त्रीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची स्थिती काय असेल, हाच उद्देश समोर ठेऊन होमिओपॅथी डॉ. दीपा बंडगर यांनी वाडा या आदिवासी पाड्यांवरील १६ गावांमध्ये सर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून स्त्री आरोग्याचे महत्त्व, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी, व्याख्याने, वैद्यकीय तपासणी शिबिरे, औषधोपचार यांच्या माध्यमातून सेवा प्रदान केली. पालघर, वाडा, मोखाडा, विक्रमगड, डहाणू आणि तलासरीतील आदिवासी कुटुंबातील मुलांना दैनंदिन लागणाऱ्या वस्तू, घरातील उपकरणे, भांडी, शाळेचे साहित्य, सायकल, चप्पल आदी दिले. मुंबईतील विविध ठिकाणच्या परिचित लोकांकडून या वापरात नसलेल्या वस्तू घेऊन त्या वापरायोग्य तयार आणि दुरुस्त करून आदिवासी मुलांना दिल्या. तसेच ४ शाळांमधील २२ मुलांच्या शिक्षणाचा खर्चही डॉ. दीपा बंडगर यांनी उचलला आहे. आपण सर्व समान आहोत या नात्याने त्यांनी ५,००० पेक्षा अधिक लोकांचे आरोग्यविषयक समुपदेशन केले आहे. आदिवासी वंचित आणि दुर्लक्षित समाजात आरोग्यविषयक जनजागृतीचे आणि प्रत्यक्ष वैद्यकीय सेवा देण्याचे सेवाकार्य डॉ. दीपा बंडगर करीत आहेत.

मूळच्या मुंबईकर असणाऱ्या डॉ. दीपा बंडगर. मेडिकल शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षाला असताना त्यांचे लग्न झाले. संसार आणि शिक्षण करत असताना त्यांनी दोन मुलांचे संगोपनही केले. बी.एच.एम.एस. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वास्थ्य समुपदेशनामध्ये (हेल्थ कौन्सिलिंग) पदव्युत्तर पदविकेचे (पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा) शिक्षण पूर्ण केले. त्यांनी मुलांचे संगोपन करत असताना त्यांच्यातही समाज भान रुजवले. पालक मुलांना दूरचित्रवाणी पाहू नका असे सांगतात. पण डॉ. दीपा बंडगर यांच्या घरी ८ वर्षांपासून दूरचित्रवाणी संच नाही. मुलांना विविध सामाजिक कार्यक्रमात सहभागी करून त्यांना खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनवले. डॉ. दीपा बंडगर यांचे कुणाशीही नाते पटकन घट्ट होते. मग ती घरात काम करणारी महिला असो, संस्थेचा सुरक्षा रक्षक असो, किंवा काही दिवसांपूर्वी ओळख झालेली मैत्रीण आदी. हे नाते चौकटीबाहेर जाऊन संपर्कात, समोर आणि समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला मदत करेपर्यंत झटत असते.

जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना डॉ. दीपा बंडगर कर्तव्य तत्परतेने प्रत्येकाला शक्य तितकी मदत करत होत्या. कौटुंबिक परिस्थिती सांभाळत मुंबईतील गोरेगाव नेस्को कोविड केंद्र आणि दहिसर कोविड केंद्रात हजारो रुग्णांना डॉ. दीपा बंडगर यांनी रात्रीचा दिवस करून वैद्यकीय सेवा दिली. दुसऱ्या बाजूला त्यांनी सफाई कामगार, पोलीस, महानगरपालिका कर्मचारी, बसचालक आणि वाहक अशा १,५०० जणांना होमिओपॅथी आणि इम्युनो बस्टर मेडिसीन स्वखर्चाने वितरीत केले. यासोबत कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियाचे समुपदेशन करून आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडले. त्यांनी  दिवसा रुग्ण पाहणे, भ्रमणध्वनीवर समुपदेशन करणे आणि रात्री पीपीई कीट घालून कोरोना रुग्ण सेवा ही १६ महिने दिली. हे करत असताना घरी असलेल्या मुलांचे व्हिडीओ कॉलिंगद्वारे संगोपन सुरु होते. सुट्टीच्या दिवसांमध्ये वैद्यकीय शिबिरे सुरु होती. कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल विविध संस्थानी घेऊन त्यांना ८ पुरस्कारांनी गौरवण्यात आले. 

समाजाचे जबाबदार नागरिक म्हणून ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करणे आणि सुका कचरा रिसायकल करणे यावरही डॉ. दीपा बंडगर भर देतात. त्या महिला आरोग्य आणि रजोवृत्तीवर व्याख्यानेही विविध ठिकाणी करतात. डॉक्टर, पत्नी, आई अशा भूमिका पार पाडत असताना एक ‘माणूस’ म्हणून आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडणे, हे समाधान मनाला नक्कीच दुप्पट ऊर्जा प्राप्त करून देणार ठरत असल्याचे डॉ. दीपा बंडगर मानतात.