मुंबई पोलिसांकडून ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे भरभरुन कौतुक !

मुंबई : बाईपण भारी देवा हा चित्रपट रिलीज होवून जवळ जवळ दीड महिना उलटून गेलाय तरी प्रेक्षकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. कुठेतरी सिनेमाची गाणीच गाजतायात तर काहीजण कोणत्या न कोणत्या पात्रात स्वतःला अनुभवत आहे. असं वाटतंय जणू या सिनेमामुळे महाराष्ट्रात एक उत्सवाचं वातावरण निर्माण झालंय.आणि आता त्यात भर म्हणजे, धकाधकीच्या जीवनात थोडा विरंगुळा हवाच या सिनेमातल्या डायलॉगचा प्रभाव म्हणा, मुंबई पोलीस झोन ५ माहीमचे डीसीपी मनोज पाटील यांनी आपल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः ‘पुरुष’ कर्मचाऱ्यांसाठी बाईपण भारी देवाचा स्पेशल शो आयोजित केला होता. यावेळी चित्रपटातील कलाकार वंदना गुप्ते आणि सुकन्या कुलकर्णी मोने, दिग्दर्शक केदार शिंदे, सहनिर्माते अजित भुरे आणि जिओ स्टुडिओज मराठीचे कंटेंट हेड निखिल साने उपस्थित होते.

चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन करत डीसीपी मनोज पाटील म्हणाले कि, ‘आमचे एसीपी कुरंदकर यांनी पुरुषांना ही फिल्म दाखवावी अशी छान कल्पना सुचवली. आम्हा पोलीसांना सणवार, सुट्ट्या नसतातच, आम्ही जास्तीत जास्त वेळ बाहेरच असतो आणि अशा वेळेस आपल्या कुटुंबाची खऱ्या अर्थाने काळजी ही आपली पत्नी किंवा घरातील स्त्री घेते. पण हे करताना तिच्या ज्या काही अडचणी असतात त्या आपल्याला माहितीच नसतात आणि म्हणूनच त्याची जाणीव करून देण्यासाठी हा चित्रपट दाखवण्याचा उद्देश्य होता. मला वाटतं सर्व पुरुष पोलिसांनी हा चित्रपट जरूर पहावा. ज्यामुळे जेव्हा महिला पोलिस स्टेशनला येतील तेव्हा त्यांच्या अडचणी आम्ही अजून चांगल्या पद्धतीने सोडवू. एवढा उत्कृष्ट चित्रपट महाराष्ट्राला आणि समाजाला दिला त्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार

अभिनेत्री वंदना गुप्ते म्हणाल्या कि,‘तुम्हा सगळ्या मुंबई पोलिसांचा मला फार अभिमान आहे, कमाल आहे तुमची. कारण तुम्ही सगळे आहात म्हणून आज आम्ही सुरक्षित आहोत, मु्ंबई सुरक्षित आहे आणि महिला सुरक्षित आहे.’

सुकन्या कुलकर्णी मोने म्हणाल्या कि, ‘आज वेळात वेळ काढून तुम्ही चित्रपट बघायला आलात, आणि आम्हा कलाकारांचे कौतुक करताय त्यासाठी तुमचे सर्वांचे मनापासून आभार! कारण तुमच्या आयुष्यात फार दुर्मिळ क्षण असतात जिथे तुम्ही निवांत बसू शकता. तुम्हा सर्वांच्या सदैव तत्परतेमुळे आज आम्ही सुरक्षित आहोत. असेच आमच्यावर प्रेम करत रहा आणि तुमचीही काळजी घ्या.’

केदार शिंदे म्हणाले कि, ‘१०० डायल केलं तर मदतीसाठी पोलिस हजर होतात! १०० पोलिस “बाईपण भारी देवा” सिनेमा पहाण्यासाठी हजर होते. दिवसरात्र सणवार आपल्या सेवेत असलेले काल २ तास आनंदात होते. सिनेमा संपल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान खुप काही देऊन गेलं. पुरूषांनी हा सिनेमा पाहायला हवा.. हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. शुक्रवारपासून चित्रपट गृहात “बाईपण भारी देवा” फ्लॅट १००/- तिकीटावर पहायला मिळणार आहे. आता पुरूषांची गर्दी नक्कीच होईल. आपल्या आवडत्या स्त्री सोबत सिनेमा पहायला!’

जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले आणि स्वतः जिओ स्टुडिओनं केली आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे हे आहेत.