मुंबई : बँक ऑफ बडोदा ही भारताची सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असून ‘बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान’ पुरस्कार २०२३ च्या पहिल्या नामांकन आवृत्तीकरिता १२ कादंबऱ्यांच्या दीर्घ यादीची घोषणा करण्यात आली. विविध भारतीय भाषांमधील (राज्यघटनेच्या ८ व्या अनुसूची अंतर्गत समाविष्ट) साहित्यकृतींना मान्यता देणे तसेच प्रोत्साहन देण्यासाठी आणि अनुवादांद्वारे हिंदी वाचकांना सर्वोत्तम भारतीय साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी, त्याद्वारे रूची विस्तार आणि कादंबरी वाचकांच्या मोठ्या वर्गापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या अद्वितीय पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे.
‘बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान’ पुरस्कार मूळ साहित्यकृतीचे लेखक आणि पुस्तकाचे हिंदी अनुवादक अशा दोघांना प्रदान करण्यात येईल. मूळ साहित्यकृतीचे लेखक आणि पुरस्कार विजेत्या पुस्तकाच्या संबंधित हिंदी अनुवादकाला रुपये २१ लाख आणि अनुक्रमे रुपये १५ लाख देण्यात येणार असून आणखी पाच निवडक पुस्तकांच्या लेखक आणि हिंदी अनुवादकांना रुपये ३ लाख आणि प्रत्येकी अनुक्रमे रुपये २ लाखाच्या रोख पुरस्काराने गौरविण्यात येईल.
बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव चढ्ढा म्हणाले, ‘भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे संस्कृती, धर्म आणि भाषांचा संगम असून विविधतेत त्याची ताकद आणि वेगळेपणा आहे. भारतीय भाषांमधील साहित्याचा प्रचार आमची बहु-सांस्कृतिकता मजबूत करण्यास मदत करतो हा आमचा असा विश्वास आहे. मूळ भारतीय भाषेतील साहित्य आणि या कलाकृतींचे हिंदीत अनुवादाला ओळख मिळावी आणि त्यांचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने आम्ही ‘बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान’ ची स्थापना केली. ‘बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान’ पुरस्कार देशाच्या विविध भागांतील प्रतिभावान भारतीय लेखकांना राष्ट्रीय व्यासपीठ देईल. भारतीय भाषा साहित्याला चालना देईल. तसेच साहित्यिक अनुवादांना प्रोत्साहन मिळेल.’
पाच सदस्यीय पुरस्कार मंडळाच्या अध्यक्षा प्रख्यात लेखिका आणि बुकर पारितोषिक विजेत्या माननीय गीतांजली श्री आहेत. इतर चार सदस्यांत भारतीय कवी अरुण कमल, शिक्षण तज्ज्ञ आणि इतिहासकार पुष्पेश पंत, समकालीन भारतीय कवयित्री आणि कादंबरीकार अनामिका आणि हिंदी कथा लेखक आणि अनुवादक प्रभात रंजन यांचा समावेश आहे.
बँकेच्या वतीने मार्च-एप्रिल २०२३ या कालावधीत नामांकनं आमंत्रित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. विविध भारतीय भाषांमध्ये लिहिलेल्या अनेक प्रवेशिका प्राप्त झाल्या, ज्यातून ज्युरींनी १२ पुस्तकांची यादी तयार केली.
मुंबईत आयोजित दीर्घ-सूची घोषणा कार्यक्रमात १२ नामांकन-प्राप्त साहित्यकृतीपैकी एक मराठी भाषेतील कादंबरी ‘नदीष्ट’चे मूळ लेखक मनोज बोरगावकर आणि अनुवादक गोरख थोरात मुक्त-परिसंवादात सहभागी झाले होते. दोन्ही लेखकांनी भारतीय साहित्यविषयक परिघ आणि भारतातील साहित्यिक बांधवांसाठी राष्ट्रभाषा सन्मान पुरस्काराचे महत्त्व यावर संवाद साधला.
‘नदीष्ट’ ही कादंबरी गोदावरी नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांच्या दैनंदिन जीवनातून निर्माण झालेल्या वातावरणाचे वर्णन करते. विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात या कादंबरीचा समावेश करण्यात आला असून पुण्यात नाट्यरूपातही या कादंबरीचे प्रस्तुतीकरण केले जाते. नदीष्ट’ची ही तीन वर्षांत आठवी आवृत्ती असून या कादंबरीचा कन्नड आणि हिंदी भाषेत अनुवाद करण्यात आला आहे.’बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान’ पुरस्कार विजेत्याची घोषणा १० जून २०२३ ला दिल्ली येथे करण्यात येईल.