स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात २८ मेला संगीतमय ‘शतजन्म शोधिताना’ चा कार्यक्रम !

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीदिनी ‘शतजन्म शोधिताना’ हा संगीतमय कार्यक्रम रविवारी २८ मे २०२३ ला आहे. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई उत्कर्ष मंडळ यांनी याचे आयोजन केले असून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि मुरबाडच्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूल यांनी निर्मिती केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अलौकिक काव्यप्रतिभा आणि त्यांचे कार्यकर्तृत्व यांना लोकांप्रत पोहोचवणारा हा आगळावेगळा कार्यक्रम आहे.

दादरला रविवारी २८ मे २०२३ ला सकाळी १०:०० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिकांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक भ्रमणध्वनी क्रमांक ९२२००७०३८६ आणि हरिश्चंद्र शंकर शिंदे ९०८२३४५७२९ यांच्याशी संपर्क साधावा. कार्यक्रम विनामूल्य असून त्यासाठी आधी प्रवेशिका घेणे आवश्यक आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विविध प्रकारच्या कविता, गीते यांचे संगीतबद्ध सादरीकरण करून त्यावर नृत्याचाही अविष्कार करीत हा ‘शतजन्म शोधिताना’ कार्यक्रम प्रेक्षकांना, रसिकांना आणि सावरकरप्रेमींना खिळवून ठेवतो. याची संकल्पना, संहिता आणि निवेदन मंजिरी मराठे यांचे असून संगीत दिग्दर्शन वर्षा भावे आणि नृत्य दिग्दर्शन डॉ. रुपाली देसाई यांचे आहे, तर संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे आहे. सावरकरांच्या अलौकिक अशा प्रतिभेचा शोध या निमित्ताने घेतला गेला आहे.