मुंबईतील निवासी जागांच्या मागणीतील १ आणि २ बीएचकेचे वर्चस्व कायम- मॅजिकब्रिक्स प्रॉपइंडेक्स अहवाल

मुंबई : मॅजिकब्रिक्स प्रॉपइंडेक्स अहवाल जानेवारी-मार्च २०२३ नुसार (Magicbricks PropIndex Report) मुंबईतील निवासी मालमत्तांच्या मागणी मागील तिमाहीच्या तुलनेत (क्यूओक्यू) २.४ टक्क्यांनी घट झाली आहे, तर पुरवठा आणि किमतीत मागील तिमाहीच्या तुलनेत अनुक्रमे ०.८ टक्के आणि २.२ टक्के वाढ झाली आहे.

शहरात निवासी मालमत्तांच्या मागणीमध्ये छोट्या घरांचा (१-२ बीएचके) वाटा सर्वोच्च आहे (सुमारे ७५ टक्के) आहे, तर या घरांचा पुरवठाही सर्वाधिक म्हणजे ७२ टक्के आहे. या बाजारपेठेतील घरे खरेदी करणाऱ्यांमध्ये परवडण्याजोग्या घरांना असलेल्या मागणीचे वर्चस्व कायम असल्याचे अभ्यासात आढळले आहे.

रोजगाराच्या केंद्रांशी समीपता आणि मेट्रोची उत्तम कनेक्टिव्हिटी यांमुळे मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये मालाड आणि कांदिवलीला असलेली मागणी कायम आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. म्हणूनच या उपनगरांनी मुंबईतील सर्वाधिक पसंतीची निवासी ठिकाणे म्हणून मिळवलेले स्थान कायम राखले आहे.

मॅजिकब्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर पै म्हणाले,‘आर्थिक वर्ष २०२३ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ६-७ टक्के दराने वाढणार आहे असा अंदाज अनेक बहुपक्षीय यंत्रणांनी व्यक्त केला आहे. अलीकडेच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातही अनेक प्रोत्साहक उपक्रम आहेत. पीएमएवाय आणि यूआयडीएफ यांसारख्या योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आणि संरचना विकासाचे चक्र वेगाने फिरू लागले आहे. परवडण्याजोग्या तसेच मध्यम-श्रेणी विभागातील घरे खरेदी करू इच्छिणाऱ्यांच्या मागणीची पुरेशी पूर्तता झालेली नाही हे लक्षात घेता, येत्या काही तिमाहींमध्येही निवासी मालमत्तांची मागणी वाढीच्या पथावर राहील अशी आशा आम्हाला वाटते. नवीन प्रकल्प आणि बांधकाम सुरू असलेल्या मालमत्तांचा ताबा वेगाने दिला जाणे यांची जोड लाभल्यास बाजारपेठ स्थिर होणे आम्हाला अपेक्षित आहे आणि त्यामुळे गुंतवणूक व नवोन्मेष यांसाठी नवीन मार्ग खुले होतील.’

ताबा देण्यासाठी तयार (रेडी-टू-मुव्ह) आणि बांधकाम सुरू असलेल्या विभागांच्या सरासरी दरात गेल्या तिमाहीच्या तुलनेत अनुक्रमे १.७ टक्के आणि २.७ टक्के वाढ दिसून आली आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ठाण्यातील निवासी बाजारपेठेची माहिती

• जानेवारी-मार्च २०२३ दरम्यान ठाण्यातील निवासी मालमत्तांची मागणी मागील तिमाहीच्या तुलनेत ६.८ टक्के वाढली, तर याच कालखंडात पुरवठा (सक्रिय लिस्टिंग) आणि सरासरी दर मागील तिमाहीच्या तुलनेत अनुक्रमे १०.७ व २.२ टक्क्यांनी घसरले आहेत.
• २ बीएचके घरांची मागणी (४७ टक्के) आणि पुरवठा (४२ टक्के) यांमध्ये विक्रमी वाट्याची नोंद केली.

नवी मुंबईतील निवासी बाजारपेठेची माहिती

• जानेवारी-मार्च २०२३ मध्ये नवी मुंबईतील निवासी मालमत्तांची मागणी (शोध घेणे) मागील तिमाहीच्या तुलनेत १.८ टक्क्यांनी वाढली आहे, तर पुरवठा (सक्रिय लिस्टिंग) मागील तिमाहीच्या तुलनेत ३.९ टक्के घटला आहे.
• नवी मुंबईतील मालमत्तेच्या सरासरी दरांमध्ये मागील तिमाहीच्या तुलनेत किंचित म्हणजे ०.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
• निवासी मालमत्ता बाजारपेठेत २ बीएचके घरांचे वर्चस्व कायम असून एकूण मागणीतील त्यांचा वाटा ५२%, तर एकूण पुरवठ्यातील वाटा ४८% आहे.
• ग्राहकांनी केलेल्या मालमत्तेच्या शोधाच्या आधारे पनवेल, खारघर आणि ऐरोली ही आघाडीची तीन निवासी ठिकाणे ठरली आहेत.