मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रेल्वे हद्दीतील झोपड्यासांठी ‘एस आर ए’ प्रमाणे योजना राबविण्याबाबत खासदार गोपाळ शेट्टी यांनी लिहिले पत्र !

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रेल्वे हद्दीतील झोपड्यासांठी ‘एस आर ए’ प्रमाणे योजना राबविण्याबाबत उत्तर मुंबई लोकसभा खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्र लिहिले आहे. ५ एप्रिल २०२३ ला खासदर गोपाळ शेट्टी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मुंबईतील रेल्वे जमिनीवरच्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन ‘एसआरए’ प्रमाणे योजना राबवण्याबाबत सांगितले आहे.

‘प्रथमतः मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन (एमआरव्हीसी) यांच्या वतीने मुंबईत सुरु असलेल्या प्रकल्पांबाबत सह्याद्री राज्य अतिथी गृहात कालच झालेल्या सादरीकरणात आपण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि परिसरातील रेल्वेच्या जमिनींवरील अतिक्रमण आणि झोपडपट्टया हटवण्यासाठी रेल्वेने पुढाकार घ्यावा. त्यासाठी एस आर ए प्रमाणेच एक नियोजन प्रणाली राबविण्यात यावी. जेणेकरून मोठ्या प्रमाणात रेल्वेला जमीन उपलब्ध होईल. तसेच अशा रहिवाशांचे योग्य पुनर्वसनही होईल, यासाठी राज्य शासनाच्या संबंधित सर्व यंत्रणांनी भू-संपादन, पुनर्वसन यासह आर्थिक सहभागाच्या अनुषंगाने प्राधान्याने कार्यवाही करण्याचे निर्देश ही आपण यावेळी दिलेत याबद्दल आपले अभिनंदन !

मुंबईत गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून काम धंद्यासाठी येणारी लोकं मिळेल त्या जागेत अ‍ॅडजस्ट होतात. जिथं जागा मिळेल तिथं निवारा शोधतात. काहीच पर्याय न उरल्याने रेल्वेपटरीच्या कडेला रिकाम्या जागेत झोपडया उभारतात. अशाच झोपड्या मोठया प्रमाणावर मुंबई शहरातील पश्चिम तसेच मध्य रेल्वेला लागून वर्षानुवर्षे आहेत.

स्थायिक झालेल्या लोकांना नोटीस देण्याचे काम रेल्वेच्या माध्यमातून केले जात आहे. त्यांना मिळालेल्या नोटिसांमुळे आज लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रेल्वेने नोटीस दिली पण पुनर्वसन योजनेसाठी कोणतीही तरतूद केली नाही. त्यांच्या पुनर्वसनाचे आधी नियोजन करावे, परंतु झोपडपट्टीवासींना बेघर होऊ न देणे अशी माझी आपल्याकडे मागणी आहे.

गेली अनेक वर्षांपासून मी आणि अनेक जण यासाठी प्रयत्न करीत आहोत. मागील वेळी सदर बाबतीत उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र देऊन नागपूरमध्ये विषय मांडला होता. आता आपण आणि उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांना आदेशित केलेत त्याबद्दल हजारो झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो. आपण हा विषय लवकरात लवकर निकाली काढावा,’ अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्राद्वारे केली आहे.