शिवराज्याभिषेक सोहळयाच्या ३५० वर्षाचे औचित्य साधून विद्यानिधी शैक्षणिक संकुलात वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन !

मुंबई: मुंबई उपनगर शिक्षण मंडळ संचालित विद्यानिधी शैक्षणिक संकुलात सर्व चौदा विद्या शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी’सोच और भोज’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये होणारे विविध उपक्रम, नियोजन आणि कारवाई यावर यात विचार मंथन करण्यात आले. ‘राष्ट्राय स्वाहाः’ या संकल्पनेतून आणि वंचितांना शिक्षण या हेतूने संस्थापक स्व. श्रीराम मंत्री यांनी विद्यानिधी शैक्षणिक संकुलाची स्थापना केली. १९५६ पासून अखंड या वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३५०वर्ष पूर्ण होत आहेत, याचे औचित्य साधून संपूर्ण शैक्षणिक वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. उपनगर शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष, इतिहासाचे गाढे अभ्यासक,लेखक रमेश मेहता यांनी शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या रोमारोमात संचारले आहेत.राष्ट्र निर्मितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांना प्रेरणादायी आहेत, असे विचार त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पद्मश्री रमेश पतंगे यांनी राष्ट्र निर्मितीत शिक्षकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ,समुपदेशक हरिश शेट्टी यांनी विद्यार्थी सर्वांगिण विकासात शिक्षकांचे महत्त्व आणि जबाबदारी यावर सखोल व्याख्यान दिले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आणि माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी पूर्वांचल राज्यांवर आधारित आपली ग्रंथसंपदा उपनगर शिक्षण मंडळाच्या वाचनालयास भेट दिली. शिवराज्याभिषेक सोहळयाचे औचित्य साधून पूर्ण वर्षभरात ज्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार याचे सादरीकरण मुख्याध्यापक संतोष टक्के, मुख्याध्यापक सतिश दुबे, मुख्याध्यापिका नीलम प्रभू, एस.एम.विटा विभाग प्रमुख सविता ठाकूर आणि प्राचार्य मनोज परमार या विभाग प्रमुखांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष संजीव मंत्री आणि निवेदन सचिव डॉ. साधना मोढ यांनी केले. या कार्यक्रमास उपनगर शिक्षण मंडळाचे कार्यकारणी सदस्य, गणमान्य व्यक्ती व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.