विद्यानिधी संकुलात ‘दिल में राम…..दिल से राम जय श्री राम …. जय श्रीराम!’

मुंबई : दिल में राम…..दिल से राम जय श्री राम …. जय श्रीराम ! उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी संकुलातील सर्व आजी-माजी विद्यार्थी कर्मचारी पालक आणि पदाधिकारी सर्वांच्या उत्साहाने अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमासाठी कैफी आजमी पार्कची निवड करण्यात आली होती. संस्कार केले तर संस्कृती टिकेल आणि हे संस्कार रुजवणारी शाळा म्हणजेच विद्यानिधी. प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून विविध नाती कशी असावी याचे एक उत्तम उदाहरण विद्यार्थ्यांच्या समोर ठेवण्यात आले. भाऊ,बहीण, शिष्य, गुरु मित्र,पुत्र,पती, पत्नी,मुलगा ही सर्वच नाती कशी असावीत याचे उत्तम उदाहरण म्हणजेच रामायण. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यानिधी संकुलाच्या सदस्या नीलम प्रभू यांनी केलं.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यानिधी मराठी, इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी मधुर आवाजात रामस्तुती गायनाने केली. विद्यानिधी इंग्रजी माध्यमातील शिक्षक प्रजापती यांनी आपल्या वेगळ्या शैलीमध्ये राम भजन सादर केले. विद्यानिधी मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी संस्कृत राम रक्षा स्तोत्र मराठी अर्थासह सादर केले. उपनगर शिक्षण मंडळाचे कर्मचारी कोटेकर यांनी प्रभू रामचंद्रांचे गीत गायन करून सर्वांना सहभागी करून मंत्रमुग्ध केलं. कमला रहेजा कॉमर्स कॉलेज तसेच वोकेशनल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळून प्रभू रामचंद्र यांच्या चित्र प्रदर्शनी बरोबरच गीत गायन करून सर्वांना आनंद दिला.

प्रभू रामचंद्रांची जीवनकथा सायन्स कॉलेजच्या विद्यार्थिनीने गाण्यातून सादर केली. विद्यानिधी सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांने संपूर्ण रामायण एका श्लोकामध्ये सांगून रामायणाचा अर्थ सादर केला. विद्यानिधी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सेतू बांधा रे या गीतावर नृत्य सादर करत सर्वांच्याच अंगात उत्साह भरला.
कार्यक्रमाचा शेवट प्रभू रामचंद्रांच्या स्तुतीने करण्यात आला यामध्ये विद्यानिधी मराठी माध्यम इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचा समारोप विद्यानिधी इंग्रजी माध्यम तसेच सायन्स कॉलेजचे मुख्याध्यापक सतीश दुबे यांनी आभार प्रदर्शनाने केला.

या कार्यक्रमासाठी सचिव साधना मोड, माजी सचिव आणि दहा वर्षे रामायण या विषयावर अभ्यास करणाऱ्या डॉ.कीर्तीदा मेहता, अध्यक्ष संजीव मंत्री, उपाध्यक्ष रमेश मेहता, खजिनदार दामले, सदस्य डॉ. सतीश मोड उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विशेष भेट आमदार अमित साटम यांनी दिली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. यानंतर विद्यानिधी संकुलाच्या बाजूने काढलेल्या रांगोळीमध्ये सुमारे ५०० शिक्षक, पदाधिकारी, विद्यार्थी,पालक, कर्मचारी सर्वांनी पणत्या लावून श्रीराम प्राणप्रतिष्ठा औचित्याने दिवाळीमध्ये सहभाग नोंदवला.