महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याकडे विधी अभ्यासकांतर्फे ‘वन नेशन वन इलेक्शन’ अहवाल सादर !

मुंबई:दिल्लीच्या उच्चस्तरीय समितीने ‘वन नेशन वन इलेक्शन’च्या अंमलबजावणीसाठी नागरिकांना आपली मते मांडण्याचे आवाहन केले होते. त्यासंदर्भात वि.प्र.मं. ठाणे महानगरपालिका लॉ कॉलेजचे प्रा. कृष्णा कामथ यांच्या मार्गदर्शनाने आणि विधी अभ्यासक शुभम सरंगुले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील विविध लॉ कॉलेजच्या विधी अभ्यासकांतर्फे एकत्रितपणे अहवाल तयार करण्यात आला. सदर अहवाल महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याकडे सादर करण्यात आला. या अहवालात ‘वन नेशन, वन इलेक्शनचे’ फायदे – तोटे, तसेच ही प्रक्रिया अमलात आणण्यासाठीचे अडथळे आणि त्यावर विधी अभ्यासकांनी सुचवलेले उपाय नमूद केलेले आहेत. सोबतच या प्रक्रियेसाठी संविधानात कोणकोणत्या अनुच्छेदांमध्ये बदल करावे लागतील याचा देखील उल्लेख या अहवालात केलेला आहे. या अहवाल निर्मितीसाठी मुंबईतील आनंद विश्व गुरुकुल, जी.एल.सी, एम.जी.एम. कॉलेज,राजश्री शाहू तसेच इतरही लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.