‘बोक्या सातबंडे’ने दिला मनोरंजनासह सामाजिक बांधिलकीतून बच्चे मंडळींना आनंद !

मुंबईच्या दादरमधले शिवाजी मंदिर…रविवारची संध्याकाळ…लहानग्या मंडळींची पालकांसह लगबग… हे दृश्य होते. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘बोक्या सातबंडे’ पुस्तकावर आधारलेले व्यावसायिक नाटक ‘बोक्या सातबंडे’ हे रंगभूमीवर बच्चे मंडळी आणि पालकांची वाहवा मिळवत आहे.

‘बोक्या सातबंडे’ हे बालनाट्य मुलांचे बालविश्व समृद्ध करणारे आणि पालकांना त्यांच्या बालपणात नेणारे आहे. बोक्या हा जे बालपण आपण अनुभवले आहे, त्यातलाच हुशार, चंचल, हजरजबाबी आणि मस्तीखोर आहे. बोक्याच्या प्रमुख भूमिकेत आरुष बेडेकर असून यश शिंदे, सायली रामदास रामेश्वरी, ओंकार यादव, अंकुश काणे, स्वाती काळे, अमृता कुलकर्णी, सौरभ भिसे, प्रथमेश अंभोरे, ओमकार कांबळे, आकाश मांजरे, स्नेहा धडवई, सागर पवार, शीवांश जोशी यांनी योग्य भूमिका बजावल्या आहेत. आजोबांचा संस्कार आणि विचार बोक्या आजही माहिती तंत्रज्ञानाच्या स्मार्ट विश्वात कसा प्रत्यक्षात आणतो, नाटकात ‘नारायण’ हा नक्की कोण आहे, नारायणच्या सोबतीला कोण- कसे कुटुंबात येतात आणि कुटुंबातून अनोखे जग कसे उलगडत जाते, बालनाट्याच्या करमणूकीचा आनंद बच्चे मंडळी कसे घेतात…हा आनंदी बालनाट्यपट रंगभूमीवर अनुभवता येईल.

मुंबईतील पहिल्या प्रयोगाला पालक आणि मुलांचा ‘बोक्या सातबंडे’ला प्रचंड प्रतिसाद लाभला. या प्रयोगाला अभिनेत्री भारती आचरेकर आणि गायिका राणी वर्मा यांची उपस्थिती होती. ‘बोक्या सातबंडे’चे लेखक डॉ. निलेश माने, क्रिएटिव्ह डायरेक्टर मिलिंद शिंत्रे, दृश्य संकल्पना प्रणव जोशी, सहायक दिग्दर्शक अभिनव जेऊरकर, दिग्दर्शक विक्रम पाटील आणि दीप्ती प्रणव जोशी, निर्माते दिनू पेडणेकर, रणजित कामत, सुनील तटकरे आणि दीप्ती प्रणव जोशी, अनामिका, भूमिका थिएटर्स, मिलाप थिएटर टूगेदर यांचे आहे.

आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे निरीक्षण करून ते हाताळण्याचं कसब आणि बळ देणारं हे नाटक आहे. जीवनातील संकटे आणि संघर्ष यांना हसतमुख आणि सदसदविवेकबुद्धीने सामोरं जाण्याची अनुभूती देणार नाटक म्हणजे ‘बोक्या सातबंडे’. पालकांनी मुलांसोबत ‘बोक्या सातबंडे’ हे बालनाट्य नाट्यगृहात जाऊन नक्की पहा.

दिग्दर्शक : विक्रम पाटील आणि दीप्ती प्रणव जोशी

– विनित शंकर मासावकर