‘पंचमुखी सुंदरकांड’चे लोकार्पण संपन्न!

मुंबई : अमिताभ शुक्ला(भा.रा.से.) यांची संकल्पना असलेल्या ‘पंचमुखी सुंदरकांड’ या म्युझिक व्हिडिओचा प्रकाशन सोहळा नुकताच महालक्ष्मी येथील ‘फेमस स्टुडिओ’मध्ये रामायण मालिकेतील राम अर्थात अरुण गोविल आणि भजन सम्राट अनुप जलोटा, प्रसिद्ध गझल जोडी अहमद हुसेन, मोहम्मद हुसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी अमिताभ शुक्ला(IRS), दीपा जोशी, संजीव विल्सन, अर्चना खासनीस आणि आकाशवाणीचे ज्येष्ठ कार्यक्रम अधिकारी रवींद्र खासनीस इत्यादी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली होती.

‘सुंदरकांड’ हे संत तुलसीदासांनी लिहिलेल्या रामचरित मानसचा भाग आहे, ज्यात सीतेच्या शोधात हनुमानाने केलेल्या लंका भ्रमंतीचे वर्णन करण्यात आले आहे. दोन तासांच्या या व्हिडिओची मांडणी पूर्णपणे अभिनव पद्धतीने करण्यात आली आहे.’पंचमुखी सुंदरकांड’ या म्युझिक व्हिडिओची संकल्पना आणि निर्मिती अमिताभ शुक्ला (IRS) यांनी केली आहे, ते सध्या मुंबईत प्रधान आयकर आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. अमिताभ शुक्ला यांच्या व्यतिरिक्त आकाशवाणी, दूरदर्शन आणि बॉलीवूडमधील नामवंत आणि प्रतिभावान कलाकार दीपा जोशी, संजीव विल्सन आणि अर्चना खासनीस यांनी गायक म्हणून योगदान दिले आहे. मंत्रमुग्ध करणारे संगीत आकाशवाणीचे ज्येष्ठ कार्यक्रम अधिकारी रवींद्र खासनीस यांनी दिले आहे.

‘रामायण’ या मालिकेत रामची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल, भजनसम्राट अनूप जलोटा आणि प्रसिद्ध गझल जोडी अहमद हुसेन, मोहम्मद हुसेन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ममता शुक्ला यांच्या हस्ते मान्यवरांना पुष्पगुच्छ देण्यात आले. या व्हिडिओची निर्मिती ममता शुक्ला यांनी केली आहे. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या वकील आहेत. त्यानंतर अमिताभ शुक्ला यांनी प्रास्ताविक करून गायक आणि संगीतकारांची ओळख करून दिली. या व्हिडीओची संकल्पना स्पष्ट करताना ते म्हणाले की, ‘सुंदरकांड’ ही आजवर अनेकांनी रचली आहे, मात्र ही आगळीवेगळी रचना पाच व्यक्ती, चार गायक आणि एक संगीतकार यांच्या प्रयत्नातून साकारली आहे. त्यामुळे याला पंचमुखी सुंदरकांड असे नाव देण्यात आले आहे. ते म्हणाले, त्याच्या निर्मितीमागील उद्दिष्टांमध्ये श्री रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येतील श्री राम मंदिराच्या लवकर बांधकामासाठी भगवान हनुमानाचे आशीर्वाद घेणे तसेच तरुणांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाबद्दल शिक्षित करणे हा मुख्य उद्देश आहे.