सौंदर्याचे आव्हान सिद्ध करणारी ‘फुलराणी’ !

‘ती’ म्हणते, ‘झगा मगा, मला बगा…’ पण हे बघणे, म्हणजे नक्की काय याची प्रत्यक्ष अनुभूती ‘फुलराणी’ या मराठी चित्रपटाने दिली आहे. लेखक आणि दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी सर्वसामान्य कोळीवाड्यातील मुलीचा प्रवास ‘फुलराणी’ चित्रपटाच्या माध्यमातून मार्मिकपणे उलगडला आहे.मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या ‘फुलराणी’च्या भावना, सौंदर्य, अभिनय कौशल्य, संवाद फेक आणि डोळा मारण्याची आकर्षक लकब लक्षवेधक ठरली आहे.

फुलराणी चित्रपटात शेवंता तांडेल सर्वसामान्य कोळीवाड्यातील फुले विकणारी मुलगी आहे. तिच्या फुल विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु असतो. फुले विकण्याच्या एका व्यवहारातून अपघाताने ती सौंदर्य स्पर्धेच्या दारात येऊन पोहचते. तिथेच उभा असलेला विक्रम राजाध्यक्ष हा ग्रुमिंग केंद्राचा संचालक फुलवालीला फुलराणी करण्याचे आव्हान स्वीकारतो. हे आव्हान स्वीकारताना फुलवालीच्या मनातले द्वंद्व, त्यातून जडलेले प्रेम, आव्हान स्वीकारून स्वत:त केलेले बदल, संघर्ष आणि स्पर्धेत स्वत्व टिकवून पाय रोवून उभी राहिलेली फुलराणी अंतर्मुख करायला भाग पाडते.

प्रियदर्शिनी इंदलकरचा अभिनय पाहून ती मुरलेली अभिनेत्री असल्याचे कळते, जो की हा तिचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. ती पदार्पणातच भाव खाऊन गेली आहे. सुबोध भावेने स्वत:च्या भूमिकेला योग्य न्याय दिला असून सुशांत शेलारने मनोरंजन विभाग वृत्तवाहिनीचा पत्रकार चांगला साकारला आहे. विक्रम गोखले यांनी चपखल अभिनय केला असून हा त्यांचा शेवटचा चित्रपट. मिलिंद शिंदे, सायली संजीव, दिपाली जाधव, अश्विनी कुलकर्णी, गौरव घाटणेकर, गौरव मालणकर, वैष्णवी आंधळे, प्रेम झांगियानी आदींनी उत्तम काम केले आहे. गीतकार अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, वैशाली सामंत, आनंदी जोशी, प्रियंका बर्वे, शरयू दाते यांच्या गाण्यांनी फुलराणीचे सौंदर्य खुलले आहे. गीतकार आणि लेखक गुरु ठाकूर, संगीतकार निलेश मोहरीर, वरुण लिखाते, पार्श्वसंगीत दिग्दर्शक आदित्य बेडेकर आणि कवी मंदार चोळकर, छायांकन केदार गायकवाड, कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी चोख भूमिका बजावल्या आहेत.

‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी’ चित्रपटात पदार्पणातच प्रियदर्शिनी इंदलकरच्या अभिनयाने मने जिंकली आहेत. फुलराणीचा दुसरा भाग येणार असून त्याचे कुतूहल आहेच. फुलराणी पाहण्यासाठी चित्रपटगृहात नक्की जा!

दिग्दर्शक: विश्वास जोशी
निर्माते : जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर
प्रस्तुती : फिनक्राफ्ट मिडिया, अमृता फिल्म्स, थर्ड एसएंटरटेन्मेंट

– विनित शंकर मासावकर