‘चैत्रचाहूल’चे ‘ध्यास सन्मान’ चतुरंगचे संस्थापक विद्याधर निमकर आणि ‘रंगकर्मी सन्मान’ गायिका-अभिनेत्री फैयाज यांना प्रदान!

मुंबई : दादरच्या शिवाजी मंदिर येथे गुढीपाडवा नूतन वर्षाच्या स्वागतानिमित्त आणि पत्रकार आणि नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीच्या औचित्याने ‘चैत्रचाहूल’ या मनोरंजन कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. १५ वर्षांपासून ‘चैत्रचाहूल’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम सुरु असून त्याचबरोबर सांस्कृतिक – सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे कार्य केलेल्या व्यक्तीला ‘ध्यास सन्मान’ देऊन आणि रंगभूमीवरील मोलाच्या योगदानाबद्दल ‘रंगकर्मी सन्मान’ प्रदान करून समाजभानही जपत आहे. या वर्षी हे सन्मान चतुरंग संस्थेचे संस्थापक विद्याधर निमकर आणि प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री फैयाज यांना ख्यातनाम दिग्दर्शक राजदत्त आणि न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

शिवाजी मंदिर इथं रंगलेला हा कार्यक्रम पत्रकार आणि संगीत रंगभूमीला पुनरुज्जीवन देणारे नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना समर्पित होता. त्यांच्या नाटकातील पदे वैशाली भडकमकर आणि सहकारी यांनी भरतनाट्यमच्या माध्यमातून, पेंढारकर आणि सुवर्णा कागल यांनी ‘स्वरसम्राज्ञी’ या नाटकातील प्रसंग सादर करून आणि गोखले यांचे नातू ओमकार दादरकर आणि संपदा माने यांच्या गायनातून सादर झाली. विवेक व्यासपीठाच्या सहकार्यानं झालेल्या कार्यक्रमाचं औचित्य साधत अजित दांडेकर यांनी पोडियमला दिलेले ऑर्गनचं रूप कौतुकास्पद आणि लक्षणीय होतं. अरुण जोशी यांची संहिता जुन्या संदर्भांचे दाखले देणारी आणि माहितीपूर्ण होती. ती संपदा कुळकर्णी आणि प्रमोद पवार यांच्या उत्कृष्ट निवेदनातून सादर झाली. कार्यक्रमाची भैरवी फैयाजजी यांनी गायल्यानं कार्यक्रमाला वेगळीच उंची लाभली. महेंद्र पवार यांच्या संयोजनात एक उत्तम कार्यक्रम घडल्याची प्रतिक्रिया रसिक देत होते.