अंधेरी शहाजी राजे क्रीडा संकुलातील जिम्नॅस्टिक्समध्ये साजरी झाली गुरुपौर्णिमा !

मुंबई:अंधेरी शहाजी राजे क्रीडा संकुलातील जिम्नॅस्टिक्स विभागामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव ४ जुलै २०२३ ला साजरा करण्यात आला. गुरुपौर्णिमा कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रेया निर्मल या खेळाडूने गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले.

‘भेटवस्तू आणू नका. तुम्ही जे शिकला आहात, ते तुमच्या पद्धतीने करून दाखवा. प्रात्यक्षिकांमध्ये २०० मुलामुलींनी प्रात्याक्षिके केली. ३०० पालक उपस्थित होते. नवोदितांपासून आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी अतिशय सुंदर प्रात्याक्षिके केली,’ असे आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक सुहास लोहार यांनी सांगितले.

जिल्हा, राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू स्वत: जिम्नॅस्टिक्स प्रात्यक्षिके बसवतात आणि त्याचे सादरीकरण केले जाते. नवोदित मुलांची प्रात्यक्षिके प्रशिक्षक बसवतात. प्रत्येकाला काही ना काही प्रात्यक्षिके करून दाखवावी लागतात, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढतो. तसेच त्यांची समाजातील आणि स्पर्धेतली भीती दूर होते.

अंधेरी शहाजी राजे क्रीडा संकुल (बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित प्रतिष्ठान) जिम्नॅस्टिक्स विभागाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. जिम्नॅस्टिक्स विभागामध्ये ३५० च्या जवळपास विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक प्रशिक्षण घेत आहेत. संस्थेने ३ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील खेळाडू घडवले आहेत.