मुंबई:२०व्या राष्ट्रीय सिलबम स्पर्धा दिनांक २२ ते २५ मार्च २०२४ दरम्यान सी एस आय हॉल कन्याकुमारी येथे झाली. भारतामधून महाराष्ट्र, दिल्ली जम्मू-कश्मीर, हरियाणा, पाँडेचेरी, तेलंगणा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आदी राज्यांमधून १,२०० खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यात महाराष्ट्राने द्वितीय क्रमांक पटकावला.
ऑल इंडिया सिलंबम फेडरेशन व इंटरनॅशनल फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कन्याकुमारी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी मराठी माध्यमिक विभागाच्या आर्या मोहितेने सूरुळ दानपट्टा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक आणि स्टिक फाईटमध्ये रौप्य पदक पटकावले. प्रणाली कालगुडे हिने सिंगल लाठी आणि फाईटमध्ये दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे.’सामान्यांना असामान्य बनवणारी शाळा’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या शाळेने राष्ट्रीय स्तरावर एक सुवर्ण पदक, दोन रौप्य पदके आणि दोन कांस्य पदके अशी एकूण पाच पदकांची कमाई विद्यानिधीच्या बालचमूने केली आहे.
भारतीय खेळ आणि स्वसंरक्षण या दोन्ही गटात मोडणाऱ्या लाठीकाठी खेळासाठी स्पर्धेसाठी मार्गदर्शन रोटरी वुमन ऑफ द इयर आरती पांडेकर, सुग्रीव पांडेकर आणि शाळेच्या वर्षा अत्तरदे यांचे लाभले होते. तसेच या स्पर्धेचा खर्च डॉ. सिद्धार्थ गावस्कर, गोरेगाव या दवेंद्र पिंगे, जुहूचे शशी सोनार, माजी विद्यार्थी सुशील विचारे, माजी विद्यार्थी अजय होगाडे यांच्या देणगीतून करण्यात आला आहे.
संस्थेचे अध्यक्ष संजीव मंत्री यांनी अशा कामात ज्या शुभचिंतकांनी शाळेची विश्वासार्हता लक्षात घेऊन मदत केली त्यांचे आभार व्यक्त केले .