मुंबई विद्यापीठात ‘पत्रकारितेसाठी उपयुक्त कायदेशीर संकल्पना’ विषयावर व्याख्यान संपन्न !

मुंबई : न्यायपालिका आणि पत्रकारिता हे लोकशाहीचे दोन प्रमुख स्तंभ असून माध्यमकर्मींना कायद्याचे मूलभूत ज्ञान असणे ही काळाची गरज आहे, ती ओळखून पत्रकारिता केली पाहिजे, असे प्रतिपादन कायदेतज्ज्ञ आणि ठाणे विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका रश्मी नाटेकर यांनी केले.

मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण व विकास संस्था आणि विद्या प्रसारक मंडळाचे ठाणे महानरपालिका विधी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ ला मुंबई विद्यापीठातील कुसुमाग्रज भवन येथे ” पत्रकारितेसाठी उपयुक्त कायदेशीर संकल्पना” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घघाटन गरवारे संस्थेचे संचालक डॉ. केयुरकुमार नायक यांच्या हस्ते करण्यात आले.

ॲड. रश्मी नाटेकर यांनी ‘माध्यमांचे स्वातंत्र्य : एक संविधानिक अधिकार’ या विषयावर व्याख्यान दिले. तसेच ज्येष्ठ पत्रकार कृष्णा जोशी यांनीदेखील विद्यार्थ्यांना न्यायालयीन बीटसाठी काम करणे हे आव्हानात्मक असले तरी अशक्य नाही असे सांगितले. न्यायालयीन कामकाजाच्या कामकाजाच्या बातम्या करताना पाळावयाची तत्वे , याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. दि. वि. गोखले पुरस्कार प्राप्त विद्यार्थी शुभम सरंगुले आणि त्याच्या विधी महाविद्यालयाच्या सहकाऱ्यांनी पत्रकारितेतील कायदेशीर बाबी सविस्तरपणे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. लोकशाही आणि माध्यम स्वातंत्र्य यांच्यातील अभिन्नता अबाधित राहणे, यातच देशाचे हित आहे, असे मत मराठी पत्रकारिता वर्गाच्या वर्ग समन्वयक प्रा.नम्रता कडू यांनी व्यक्त केले. आणीबाणीच्या काळात वृत्तपत्र स्वातंत्र्याची झालेली पायमल्ली’ या विषयावर त्यांचे पत्रकारिता विद्यार्थ्यांसाठी माहितीपर व्याख्यान झाले.त्यात त्या बोलत होत्या. गरवारे संस्थेच्या पत्रकारिता वर्गाच्या बालाजी बडे, मनीषा घेवडे , श्रेयस पांडे आणि जुही धर्मे या माजी विद्यार्थ्यांनी देखील त्यांचे पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव व्यक्त केले. वर्गाचे ज्येष्ठ शिक्षक देखील या कार्यक्रमास उपस्थित होते.