मराठी कलाविश्वातील प्रतिभेच्या सन्मानासाठी ‘टीव्ही ९ मराठीचा ‘आपला बायोस्कोप’

मुंबई : महाराष्ट्रातील क्रमांक १ मराठी न्यूज चॅनेल TV9 मराठीच्या वतीने ‘आपला बायोस्कोप २०२३’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन जगतातील नवोदित तसेच दिग्गज कलाकारांचा सन्मान ‘आपला बायोस्कोप २०२३’ हा पुरस्कार देऊन केला जाणार आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्ती, समूह यांच्या कामाचा गौरव याप्रसंगी केला जाणार आहे. येत्या ३० नोव्हेंबरला ‘आपला बायोस्कोप २०२३’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा मुंबईत संपन्न होणार आहे.

गेल्या दोन दशकांत मराठी सिनेसृष्टीने मोठी झेप घेतल्याचे पाहायला मिळते. मनोरंजनासोबतच विविध विषय मराठी कलासृष्टीने अत्यंत समर्थपणे हाताळले. अभिरुचीसंपन्न आणि चोखंदळ मानल्या जाणाऱ्या मराठी प्रेक्षकांनी अशा अनेक कलाकृती अक्षरश: डोक्यावर घेतल्या. मालिका आणि सिनेजगतातील उत्कृष्ट कलाकृतींचा गौरव ‘आपला बायोस्कोप २०२३’ या पुरस्काराच्या माध्यमातून केला जाणार आहे.

मालिकांसाठी सर्वोत्कृष्ट मराठी मालिका, सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेता, सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट खलनायक, सर्वोत्कृष्ट खलनायिका, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट नॉन-फिक्शन या श्रेणी, तर चित्रपट विभागासाठी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट खलनायक, सर्वोत्कृष्ट जोडी, वर्षातील सर्वोत्कृष्ट गाणे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत.

संबंधित मराठी चित्रपट अथवा मालिका प्रसारणासाठी कोणताही कायदेशीर अडथळा नसावा. सदर चित्रपट अथवा मालिका १ नोव्हेंबर २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत प्रदर्शित अथवा प्रसारित झालेली असावी. टेलिव्हिजन मालिका किमान २६ भागांमध्ये प्रसारित झालेली असणं आवश्यक आहे. इच्छुकांना ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत नामांकने सादर करता येतील.

निवड झालेल्या नामांकनांची यादी पुरस्काराच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी www.tv9marathi.com/aaplabioscope या वेब पेजला भेट द्यावी.
TV9 मराठी हे चॅनल भारतातील नंबर १ न्यूज नेटवर्क TV9 नेटवर्कचा भाग आहे. मागील एक वर्षापेक्षा जास्त काळापासून TV9 मराठी महाराष्ट्रातील निर्विवाद नंबर १ मराठी न्यूज चॅनल असून राज्यातील सर्व स्तरातील प्रेक्षकांची पहिली पसंती आहे. (स्रोत: BARC इंडिया)