राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाला २ रौप्य; महिला आणि पुरुष संघाची सोनेरी यशाची झुंज अपयशी

३७वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा:

पणजी : महाराष्ट्र संघाने शनिवारी ३७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदकाने खाते उघडले आहे. महाराष्ट्राचे हे महिला आणि पुरुष हे दोन्ही बॅडमिंटन संघ आपापल्या गटामध्ये रौप्यपदकाचे मानकरी ठरले. या ठिकाणी दोन्ही संघांना पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे महाराष्ट्राच्या नावे बॅडमिंटन खेळ प्रकारात दोन रौप्यपदकाची नोंद झाली आहे. महाराष्ट्र संघाला पुरुष गटाच्या फायनलमध्ये कर्नाटक टीमविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. कर्नाटक संघाने ३-१ अशा फरकाने विजय संपादन केला. यासह कर्नाटक संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राकडून रोहनने एकमेव एकेरीचा सामना जिंकला. तसेच महाराष्ट्र महिला संघाला फायनलमध्ये आसामने पराभूत केले. आसाम संघाने सलग सामने जिंकून ३-० ने महाराष्ट्रावर एकतर्फी विजय संपादन केला. यादरम्यान महाराष्ट्राला एकाही लढतीत बाजी मारता आली नाही.