दादरच्या शिवाजी उद्यानात खासदार राहुल शेवाळे यांच्या ‘थेट संवाद’ उपक्रमाला स्थानिकांचा सकारात्मक प्रतिसाद !

मुंबई:सुमारे तीन वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे अशास्त्रीय पद्धतीने टाकलेली अतिरिक्त माती काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने त्वरित कामाला सुरुवात करावी, अशी सूचना शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी पालिका प्रशासनाला केली. तसेच सुमारे तीन वर्षांपूर्वी शिवाजी उद्यानामध्ये कोणत्याही शास्त्रीय अभ्यासाशिवाय अतिरिक्त माती टाकणाऱ्या कत्रांटदारांविरोधात कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. या कार्यक्रमाला खासदार राहुल शेवाळे यांच्यासह आमदार सदा सरवणकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, मनसे नेते संदीप देशपांडे, पोलिस उपायुक्त मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त काकडे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे तानाजी यादव, पालिका उपायुक्त (पर्यावरण) अतुल पाटील, उपायुक्त रमाकांत बिरादार, सहाय्यक आयुक्त प्रशांत सकपाळे, पालिकेचे माजी सल्लागार नंदन मुणगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दादरच्या छत्रपती शिवाजी उद्यान येथील मातीमुळे गेल्या काही काळापासून आजूबाजूच्या परिसरात प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच या ठिकाणी कायदा – सुव्यवस्था, फेरीवाले, पार्किंग अशा अनेक समस्यांचा स्थानिकांना सामना करावा लागत आहे. यावर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीने शिवाजी उद्यान जिमखाना येथे ‘ थेट संवाद ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालिकेचे माजी सल्लागार नंदन मुणगेकर यांनी तीन वर्षांपूर्वी अशास्त्रीय पद्धतीने मैदानात टाकलेल्या मातीविषयी पूर्ण माहिती दिली. त्यांनतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माजी सल्लागार मुणगेकर यांना पुन्हा सल्लागार म्हणून नेमण्याचा प्रस्ताव, सर्व नागरिकांच्या वतीने मांडला. आणि त्याला सर्व मान्यवरांनी अनुमोदन दिले. तसेच मुणगेकर यांच्या सल्ल्याने अतिरिक्त माती काढण्यासाठी त्वरित कारवाई सुरू करावी, अशी सूचना खासदार शेवाळे यांनी पालिकेला दिली.

“ छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने देखील अनेक सामने खेळवले जातात, त्यांच्याकडूनही पार्काचा वापर केला जातो. त्यामुळे शिवाजी पार्कच्या देखभालीची जबाबदारी एमसीएने देखील घ्यावी.”
– खासदार राहुल शेवाळे

या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या नागरिकांनी धुळीचे प्रदूषण, शिवाजी उद्यान परिसरातील फेरीवाले, बेकायदा पार्किंग, महिलांसाठी सार्वजनिक टॉयलेट, उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर रोषणाई, संपूर्ण परिसरात सी सी टी व्ही, नव्या बांधकामामुळे होणारी झाडांची कत्तल, कायदा – सुव्यवस्थेची समस्या, पाळीव कुत्र्यांच्या उघड्यावरील शौचाची समस्या या आणि अशा अनेक विषयांवर आपली मते मान्यवरांच्या समोर मांडली. या सर्व समस्यांची दखल घेत त्यावर त्वरित उपाययोजना करण्याची ग्वाही यावेळी खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.