महाराष्ट्राची हॉकीत विजयी सलामी

३७वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
मापुसा: आंतरराष्ट्रीय हॉकीपटू युवराज वाल्मिकीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या पुरुष हॉकी संघाने ओडिशाचा २-१ असा पराभव करून राष्ट्रीय स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली.मापुसा येथील पेड्डेम क्रीडा संकुलात चालू असलेल्या हॉकी क्रीडा प्रकाराच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राकडून जुगराज सिंग आणि वेंकटेश केंचे यांनी प्रत्येकी एकेक गोल केले.

पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या सत्रात ही कोंडी फुटली. सामन्याच्या २८व्या मिनिटाला महाराष्ट्राला पेनल्टी कॉर्नर मिळाला. युवराजच्या पासवर जुगराजने त्याचे गोलमध्ये रूपांतर करून महाराष्ट्राचे खाते उघडले. त्यामुळे मध्यंतराला महाराष्ट्राकडे १-० अशी आघाडी होती.

तिसरे सत्र अतिशय रंगतदार ठरले. सामन्याच्या ३३व्या मिनिटाला ओडिशाकडून अजय कुमार एक्काने पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करून १-१ अशी बरोबरी साधली. परंतु सत्र संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना वेंकटेशने मैदानी गोल करून महाराष्ट्राला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी महाराष्ट्राने मग अखेरच्या सत्रात टिकवून सामना जिंकला.