१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने ‘शिक्षकांसाठी बालरंगभूमी प्रबोधन कार्यशाळा’ !

सोलापूर : १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने प्रा.देवदत्त पाठक यांनी ४३२शाळांमधील १,००० शिक्षकांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन केले आहे.गावागावात शहरात संमेलनानिमित्त बालरंगभूमीकलेची रुजवात व्हावी, यासाठी सोलापूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद(विभागीय)आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांसाठी बालरंगभूमी प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नाट्यशास्त्रतज्ञ प्रा. देवदत्त पाठक यांची सहा दिवसांची रंगभूमी प्रबोधन कार्यशाळा सोलापूरमध्ये २५डिसेंबरपासून सुरू झाली आहे, या कार्यशाळेत विशेषतः प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांच्यासह सोलापूरातील युवक रंगभूमी कलाकारांसाठी नाट्यलेखन ते निर्मिती प्रक्रियेतील महत्त्वाच्या घटकांचे प्रशिक्षण यात देण्यात येत आहे.प्रयोगनिर्मिती आणि नाट्यनिर्मिती प्रवास यावरील विशेष घटकांची रंगमंचीय खेळातून प्रा.देवदत्त पाठक आणि नाट्य शिक्षक मिलिंद केळकर आणि गुरूस्कूल गुफानची टीम रंगभूमी कला सत्र घेत आहेत

‘मुलांबरोबर जर का शाळामधून रंगमंचीय खेळांची सुरुवात झाली तर रंगभूमी अधिक समृद्ध होईल ,जिथे जिथे शाळा आहेत तिथे तिथे अशा प्रकारच्या रंगभूमी प्रबोधन कार्यशाळा घेऊन आणि तिथल्या शिक्षकांना त्यामध्ये सहभागी करून घेतले तर निश्चितच रंगभूमीकला तळागाळापर्यंत अधिक चांगली पोहोचू शकेल,’ असे विचार प्रा. देवदत्त पाठक यांनी मांडले.

नाट्य कार्यशाळा घेण्यासाठी सोलापूरचे रंगकर्मी विजयकुमार साळुंखे आणि कृष्णा हिरेमठ तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी रात्रंदिवस झटत आहेत, या कार्यशाळेतून किमान १,०००शिक्षकांना प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे, त्यातून रंगभूमी अधिक सशक्त आणि सक्षम होणार आहे, असे प्रतिपादन विजय साळुंखे यांनी केले आहे. १००व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनासाठी शिक्षकांना ही खास संधी असणार आहे. यातूनच पुढे नाट्य दिंडी,बालनाट्य, नाटय छटा, पथनाट्य, नाटय वाचन या प्रयोग निर्मितीसाठी शिक्षकांना उपयोग होणार आहे.