‘वीर सावरकर- फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ पुस्तकाचे प्रकाशन !

मुंबई:‘स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळे देशाची फाळणी झाल्याचा अपप्रचार काँग्रेसकडून वारंवार केला जातो, त्याला हे पुस्तक म्हणजे पुराव्यानिशी दिलेले चोख प्रत्युत्तर आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी २० एप्रिल २०२३ ला केले. ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर अनुवादित ‘वीर सावरकर- फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात करण्यात आले.

‘सावरकरांची देशभक्ती, त्याग, त्यांचे कार्य शब्दांत मांडणे कठीण आहे. त्यांचे वर्णन शब्दांच्या पलीकडचे आहे. त्यामुळे नव्या पिढीला सावरकर समजून घ्यायचे असतील, तर हे पुस्तक प्रत्येकाने वाचायला हवे. काही लोक इतिहास घडवतात, काही लोक पळवतात. काँग्रेसने या देशाचा इतिहास पळवला आणि आपल्याला हवा तसा लिहून घेतला. त्यांनी नागरिकांना इतिहासाची एकच बाजू दाखवली.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्त्व प्राणाहून प्रिय होते. पण त्यांचा वारसा सांगणारे आज राहुल गांधींच्या गळ्यात गळे घालत आहेत,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणाले.

यावेळी भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, आमदार अतुल भातखळकर, केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर, भाजपचे आमदार नितेश राणे, शिवसेना आमदार सदा सरवणकर आणि ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सहकार्यवाह स्वप्निल सावरकर यांनी केले.

यावेळी रणजित सावरकर यांनी सांगितले की,‘आम्हाला इतिहासाचे जतन करावे लागत आहे. कारण आमचे राज्यकर्ते करंटे होते. जनता झोपलेली आहे. ७५ वर्षांपूर्वीचा इतिहासही आपल्याला माहिती नसतो, हे आपले दुर्दैव आहे. खरे तर स्वातंत्र्यपूर्व काळात वीर सावरकर यांनी जे जे विचार मांडले होते, त्यांचे तंतोतंत पालन झाले असते तर आज या पुस्तकाचे नाव ‘वीर सावरकर फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ या ऐवजी ”वीर सावरकर फाळणी टाळलेला महापुरुष’ असे झाले असते. वीर सावरकर यांनी त्या काळी सांगितलेल्या विचारांचा आजही अवलंब करण्याची गरज आहे, कारण देश पुन्हा एकदा फाळणीच्या पायरीवर आहे. आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार अंमलात आणले, तर भारत आर्थिक महासत्ता बनेल, यात शंका नाही, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर म्हणाले.

‘केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर आणि चिरायू पंडित यांनी मूळ इंग्रजी भाषेत लिहिलेल्या पुस्तकांचा हा मराठी अनुवाद आहे. याच मंचावर या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन करताना मी सांगितले होते की, हे पुस्तक मी मराठीत आणीन. आज तुमच्या साक्षीने हे वचन मी पूर्ण केल्याचा आनंद आहे. हे पुस्तक माझ्यासाठी एक भाषांतराची असाइन्मेंट नव्हती, तर वैचारिक जबाबदारी होती. सावरकर नावाची लस माझ्यासारख्या अनेकांना लहानपणीच टोचली गेली होती. त्यामुळेच आम्ही वैचारिक दृष्ट्या जिवंत आहोत, असे उद्गगार ‘वीर सावरकर फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ या पुस्तकाचे अनुवादक आणि ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी यावेळी काढले.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले हे सत्य आहेच, पण त्याच्या आदल्या दिवशी देशाची फाळणी झाली, हेही तेवढेच कटू सत्य आहे. त्याआधी १०० वर्षांपूर्वीही या देशाचे सातवेळा तुकडे झाले. तो सर्व अखंड भारत पुन्हा एकत्र येईल, त्यावेळेलाच या पुस्तकात लिहिलेले सावरकर प्रत्यक्षात आले असे म्हणता येईल, असेही त्यांनी सांगितले.

‘वीर सावरकर यांचे राष्ट्रीय सुरक्षेविषयीचे विचार स्वातंत्र्य काळात अमलात आणले असते, तर भारत आर्थिक महासत्ता बनला असता. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वीर सावरकर यांनी जे विचार मांडले होते त्यावरून ते राष्ट्रीय सुरक्षेतील नॉस्त्रादेमस होते,’ असे केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर यांनी सांगितले.