२९ एप्रिलला रंगणार ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२३’ पुरस्कार सोहळा

मुंबई:विवेकाची, विचारांची आणि समृद्ध कलेची वैभवशाली परंपरा आपल्या महाराष्ट्र राज्याला आहे. जितका भाविक तितकाच कणखर, जितका उदार तितकाच कर्तृत्ववान असा हा महाराष्ट्र प्रदेश. राजे-महाराजे, संत-कलावंत, सुधारक-समाजसेवक, या सर्वांची भूमी म्हणजे महाराष्ट्र. या मातीशी ज्याचं नातं जुळलं ते खरोखरच भाग्यवान. अनेकांच्या योगदानातून महाराष्ट्राची जडणघडण होत गेली आहे. महाराष्ट्राच्या मातीतल्या तुम्हा आम्हा सर्वांना अपरंपार आनंद देऊन महाराष्ट्राची ओळख आपल्या कार्यकर्तृत्वाने अधिक ठसठशीत करणाऱ्या काही मान्यवरांचा सन्मान करणारा ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२३’ हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्र् दिनाचे औचित्य साधून संपन्न होणार आहे.‘अर्थ’ या संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता असलेल्या संस्थेतर्फे दिनांक २९ एप्रिल २०२३ ला बांद्रा कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानात ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२३’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.

आपल्या कार्यकर्तृत्वातून आणि कष्टातून ज्यांनी महाराष्ट्राचे नाव गाजवले, ज्यांनी इथं प्रगती घडवून आणली, अशा महाराष्ट्राच्या असामान्य धुरिणींचा आणि संस्थांचा सन्मान या सोहळ्यात केला जाणार आहे. राजकारणापासून तंत्रज्ञानापर्यंत, व्यवसायापासून कलेपर्यंत अनेक प्रकारच्या क्षेत्रांत महाराष्ट्राने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. आपल्या कष्टाने आणि उपजत गुणांनी संधीचे सोने करत महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या, कर्तृत्वगुणांची दखल घेणारा ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२३’ हा सोहळा महाराष्ट्रासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांप्रती ऋण व्यक्त करण्याचा आनंद सोहळा आहे. या सोहळयात महाराष्ट्राच्या कर्तृत्वाची आणि संस्कृतीची झलक अनुभवायला मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. हा सोहळा सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

‘सन्मान महाराष्ट्राचा’ २०२३’ या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि अभिनेत्री समीरा गुजर करणार आहेत. समाज माध्यमाद्वारे ही या सोहळ्याचा आस्वाद घेता येणार आहे. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२३’ हा आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी केलेला सन्मान असेल. आपणही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहात, म्हणूनच आपण जरूर उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.

या सोहळ्याचे आयोजन करणारी ‘अर्थ’ ही संस्था २०१९ पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या इकनॉमिक अँड सोशल कौन्सिलची ‘विशेष सल्लागार’ ही मान्यताप्राप्त असलेली संस्था आहे. ही संस्था सामाजिक आणि आर्थिक सुधारणांना उत्प्रेरित करण्यासाठी कार्यरत आहे. या सोहळ्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

● सन्मानित करण्यात येणाऱ्या मान्यवरांची नावे…

पद्मश्री दादा इदाते (सामाजिक क्षेत्र)

पद्मश्री गिरीश प्रभुणे (शैक्षणिक क्षेत्र)

पद्मश्री राहीबाई पोपेरे (बीज माता, कृषी क्षेत्र)

शैलेश गांधी, माजी माहिती आयुक्त, भारत सरकार (सामाजिक क्षेत्र)

अनिल गलगली (सामाजिक क्षेत्र)

हेमा राचमाले (सामाजिक क्षेत्र) परदेशात राहून भारतीयांसाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत.

प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र, (प्रशासकीय क्षेत्र)

अवंतिका चव्हाण (क्रीडा क्षेत्र )

मनीष अडविलकर (क्रीडा क्षेत्र )

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक महेश कोठारे (सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्र)

अभिनेता आकाश ठोसर (सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्र)

संगीतकार अविनाश चंद्रचूड आणि विश्वजीत जोशी (सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्र)

महेश झगडे, माजी आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, (आरोग्य क्षेत्र)

डॉ. पंकज चतुर्वेदी, उप-संचालक, टाटा मेमोरियल सेंटर, ( आरोग्य क्षेत्र)

योगेश लखानी, संस्थापक आणि अध्यक्ष, ब्राइट आउटडोअर मीडिया, (उदयॊग क्षेत्र)

नितीन पोतदार, (आर्थिक क्षेत्र)

य. दु. जोशी (मराठी पत्रकारिता क्षेत्र)

राहुल गडपाले, मुख्य संपादक, सकाळ माध्यम समूह (मराठी पत्रकारिता क्षेत्र)

धर्मेंद्र जोरे, राजकीय संपादक, मिड-डे ( इंग्रजी पत्रकारिता क्षेत्र)

पॉला मॅकग्लिन, सीईओ, भाडिपा (डिजिटल क्षेत्र)

मधुरा बाचल, मधुराज रेसिपी, (डिजिटल क्षेत्र)

फोकस इंडिया (डिजिटल क्षेत्र)

रतन लथ, अध्यक्ष, फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडेमी (शैक्षणिक क्षेत्र )

प्रोफेसर उल्हास बापट संविधान तज्ञ (शैक्षणिक क्षेत्र )

गोल्डस जिम (फिटनेस)

लेखक- दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्र)