बारावीच्या विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा

नवी मुंबई : कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामधून आर्ट, सायन्स आणि कॉमर्स शाखांमधून बारावीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील आठवड्यापासून सुरु होत असलेल्या परिक्षांकरिता शुभेच्छा आणि निरोप समारंभाचा कार्यक्रम १४ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाच्या पटांगणावर पार पडला. यावेळी विचारमंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र पाटील, प्रा. योगिता पाटील, ‘नवे शहर’चे उपसंपादक राजेंद्र घरत, प्रा. आर एस रोकडे, प्रा. अल्पना निकम, प्रा. निलम हुले, डॉ. उमेश पळणीटकर, प्रा. हरिश फाळके, प्रा. सुजाता पाटील, प्रा. वहिदा कुरेशी प्रा.संजय म्हात्रे उपस्थित होते.

यावेळी प्रा. योगिता पाटील यांनी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व त्यानंतर शालेय-महाविद्यालयीन शिक्षणात कोणते फेरबदल होतील, रोजगार व अन्य संधींसाठी ते धोरण किती उपयुवत ठरेल याची थोडवयात माहिती सांगितली व आणखी तपशीलवार माहिती देण्यासाठी पुन्हा विद्यार्थ्यांसमोर येणार असल्याचे सांगितले. शालेय-महाविद्यालयीन मुला-मुलींनी यापुढे जाताना आपल्याला काय आवडते तेच निवडावे, वडील-आई, काका-मामा, मित्र, मैत्रीणी सांगताहेत, त्यांची इच्छा आहे, त्यांनी निवडले आहे म्हणून कुठल्याही ज्ञानशाखेची निवड करु नये; मेडिकल, इंजिनियरिंग, वकीली या पारंपारिक वलयाच्या क्षेत्रांसोबतच सनदी लेखापाल, फॅशन डिझाइनिंग, पायलट, चांगला मानसन्मान आणि रोजगार मिळवून देणारे क्रीडाप्रकार निवडावे आणि या महाविद्यालयाचे नाव उंचवावे असे आवाहन यावेळी राजेंद्र घरत यांनी आपल्या भाषणातून केले. प्राचार्य रविंद्र पाटील यांनी आपले महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या विविध अडचणींवर मार्ग काढण्यासाठी कसे तत्पर आहे हे सांगतानाच परिक्षेला खंबीरपणे व निर्भयपणाने सामोरे जाण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

यावेळी प्रा. रोकडे, प्रा. निकम, प्रा. हुले आदिंनीही आपले मनोगत मांडले. विद्यार्थ्यांमधून सिध्देश पाटील, वैदेही जाधव, संस्कृती शिंदे, भूमिका नाईक यांच्यासह काहीजणांनी धिटाईने आपले विचार गद्य व पद्यातूनही मांडले व या महाविद्यालयातील ते दिवस किती रम्य होते याच्या आठवणी जागवल्या. यावेळी येथील विविध घडामोडींची चित्रमय झलक असलेली मोठी फ्रेम विद्यार्थ्यांनी भेटीदाखल प्रा.रविंद्र पाटील यांच्याकडे सोपवली.