गाववस्त्यांपर्यंत बालनाट्य पोहचवता आल्याचे समाधान – प्रा. देवदत्त पाठक

मुंबई : बालरंगभूमी प्रसारासाठी दिनांक १० एप्रिलपासून अथक मेहनतीने २१ गाव आणि २१ संस्था यासाठी प्रा.देवदत्त पाठक,मिलींद केळकर आणि त्यांच्या गुफानने सलग २१ कार्यशाळा पूर्ण केल्या. गाव, शहरे, उपनगरे, वस्त्या आणि पाड्यांवर जाऊन व्यक्तिमत्त्व विकसन, क्षमता विकसन, बालनाट्याची ओळख, नाट्य प्रयोग बघणे आणि करून दाखवणे अशा विविध हेतूंना साध्य करत या कार्यशाळा मुंबई, नाशिक, पुणे, उरळी कांचन आणि या शहरांची उपनगरे येथे बाल कुमारांच्या प्रचंड उत्साहात आणि सहभागाने पार पडल्या.मुलांचे नाटक कसे असावे, त्याचा विषय, त्याचे सादरीकरण कसे साधे, सोपे आणि तंत्र रहित असावे. यासाठी कार्यशाळा घेताना मुलांनी आत्मविश्वासाने कार्यशाळेच्या शेवटी घाई, वेड, शाळा, भांडण, निर्णय, खेळ अशा विषयांवर छोटी नाटके सादर केली आणि पालक प्रेक्षकांची मने जिंकली.

‘गाववस्त्यांपर्यंत बालनाट्य पोहचवता आले याचे समाधान मिळाले ,तरी अशी कितीतरी मुले बालरंगभूमी पासून लांब आहेत, त्यासाठी अजून काम करत रहायचे आहे अशा या उपक्रमाच्या पूर्णत्वाच्या वेळी प्रा.देवदत्त पाठक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.’

ज्या ज्या संस्था आणि व्यक्तींनी हा उपक्रम यशस्वी करण्यास मदत केली त्यांचे आणि गुफानच्या मिलींद केळकर, सीमा जोगदनकर, अक्षता जोगदनकर, आलोक जोगदनकर, तनया जाधव यांचे देवदत्त पाठक यांनी विशेष आभार मानले.