छठपूजेसाठी भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन

छठपूजेसाठी एक खिडकी योजना; भाविकांसाठी स्वच्छता, पाणी आणि शौचालयांची व्यवस्था

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत छठपूजेचा उत्सव यंदाही उत्साहात आणि सुरळीत पार पडावा, यासाठी मुंबई महानगरपालिकेने विशेष नियोजन करावे. यासाठी छठपूजेदरम्यान भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आज बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला २० हून अधिक छठपूजा समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी विविध सूचना आणि मागण्या मांडल्या. त्यानुसार आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.

मुंबईतील मढ-मार्वे, जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी आणि बाणगंगा यांसारख्या ठिकाणी छठपूजेसाठी मोठ्या संख्येने भाविक एकत्र येतात. विशेषतः जुहू चौपाटीवर सुमारे पाच लाख भाविक छठपूजेसाठी उपस्थित राहत असल्याने तेथे पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. सार्वजनिक स्वच्छतागृहे, कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या, पिण्याचे पाणी तसेच इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यावर समित्यांच्या प्रतिनिधींनी भर दिला.

“छठपूजा स्थळांवर भाविकांची गैरसोय टाळा – कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा”

छठपूजा हा श्रद्धेचा आणि सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा उत्सव आहे. मुंबई महानगरपालिकेने छठपूजा स्थळांवर कृत्रिम तलाव, स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच, एक खिडकी योजनेद्वारे परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करून भाविकांची गैरसोय टाळावी. मुंबईची सर्वसमावेशक संस्कृती जपत छठपूजा उत्सव सुरक्षित आणि उत्साहात नक्कीच पार पडेल.

मुंबईतील विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार कृत्रिम तलावांची निर्मिती करावी, छठपूजेच्या काही दिवस आधी सर्व चौपाट्यांची स्वच्छता करावी आणि गिरगाव चौपाटीवर पूजा-अर्चनेसाठी व्यासपीठ उभारावे, अशा मागण्याही करण्यात आल्या. छठपूजेसाठी आवश्यक साहित्य आणि इतर सुविधा महापालिकेने उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षाही प्रतिनिधींनी व्यक्त केली.

छठपूजेच्या आयोजनासाठी परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी महापालिकेच्या सर्व संबंधित विभागीय कार्यालयांमध्ये एक खिडकी योजना राबविण्याबाबत सूचना दिल्या जातील. तसेच प्रत्येक ठिकाणी समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. आवश्यकतेनुसार अधिक कृत्रिम तलाव उभारण्यासह अग्निशमन दलाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही यंत्रणा, विद्युत रोषणाई, फिरती स्वच्छतागृहे आणि कपडे बदलण्यासाठी खोल्या उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन महापालिकेने दिले.

मुंबई महानगरपालिका इतर सणांच्या वेळी ज्या पद्धतीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देते, त्याच धर्तीवर छठपूजेसाठीही व्यवस्था करण्यात येईल. भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, याची विशेष काळजी घेतली जाईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.

यावेळी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, नगरसेवक बाळा तावडे, महानगरपालिकेचे अधिकारी आणि समित्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थिती होती.