मुंबई: अंधेरीच्या विद्या विकास मंडळ आयोजित आणि विद्या विकास कला मंच प्रस्तुत ‘गौरव कर्तृत्वाचा… आणि सुरांची कोजागिरी’ हा विशेष कार्यक्रम विद्या विकास मंडळाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर सादर झालेल्या सुरेल संगीत मैफलीने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढवली.
वर्ष १९५६ पासून अंधेरी पश्चिम परिसरातील मराठी मुलांना शिक्षणासोबत संस्कार देण्याचे कार्य विद्या विकास शाळा करत आहे. या शाळेतून घडलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे. अशा कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या अध्यक्षा आणि माजी मुख्याध्यापिका सुधा राजे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी चित्रपट निर्मिती क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आलेले सुनील नायक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्याबद्दल नगरसेवक यशोधर फणसे, अग्निशमन सेवेतील शौर्याबद्दल राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित मनोज सावंत, तसेच गिर्यारोहण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विनय खेडेकर आणि हेमंत कांबळे यांचा गौरव करण्यात आला.
या सत्काराच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करतानाच शाळेतील आठवणींनाही उजाळा मिळाला. विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वातून संस्थेने जपलेल्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे प्रतिबिंब या सोहळ्यातून दिसून आले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित ‘सुरांची कोजागिरी’ या संगीत मैफलीत सुरेल गीतांची मेजवानी रसिकांना अनुभवता आली. मधुर स्वरांनी सजलेल्या या मैफलीचा उपस्थितांनी मनमुराद आनंद घेतला.
या सोहळ्यास संस्थेचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक आणि विशेष निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळा आणि माजी विद्यार्थी यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करणारा, कर्तृत्वाचा गौरव आणि संगीताचा आनंद यांचा सुंदर संगम साधणारा हा सोहळा विद्या विकास मंडळाच्या वाटचालीतील एक अभिमानास्पद आणि संस्मरणीय क्षण ठरला.