मुंबई : भारतीय तायक्वांदो संघटनेच्या अध्यक्षपदी नामदेव शिरगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मुंबई येथे भारतीय तायक्वांदोच्या वतीनं विशेष सर्व साधारण बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत २५ राज्य संघटनेचे सदस्यही सहभागी झाले होते. निवृत्त न्यायमुर्ती भगवंतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक पार पडली. धर्मादाय आयुक्त शरद मांडके यांच्या सुचनेप्रमाणे गायकवाड यांनी या निवडणुकीचे निरीक्षण केले.
यादरम्यान महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेचे विद्यमान सचिव नामदेव शिरगावकर यांच्या नावावर अध्यक्षपदाचा शिक्कामोर्तब करण्यात आलं.पंजाबच्या वीणा अरोरा यांच्याकडे वरीष्ठ उपाध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. त्यापाठोपाठ तामिळनाडूचे सॉक्रेटिस यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.तसंच सेक्रेटरी जनरलपदी महाराष्ट्राच्या अमित धमाळ यांची नियुक्ती करण्यात आली. उत्तर प्रदेशचे रजत दीक्षित हे खजिनदार असतील. कार्यकारी समिती सदस्यपदी आसामच्या गितीका तालुकदार आणि गुजरातच्या विकास कुमार यांची निवड करण्यात आली.
‘तायक्वांदो खेळ प्रकारात जागतिक स्तरावर आता पुन्हा एकदा भारतीय खेळाडूंचे वर्चस्व राहणार आहे. यासाठी आम्ही खास पद्धतीनं तंत्रशुद्ध प्रशिक्षणांसह खास प्रशिक्षकांची निवड करणार आहोत. तसेच या युवांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी मोठ्या संख्येत स्पर्धां आयोजनावर आमचा भर असेल. यातून देशभरातील युवांना यातून आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळेल. याशिवाय देशाच्या कानाकोपऱ्यात गुणवंत असे तायक्वांदोचे खेळाडू तयार होतील,’ अशी प्रतिक्रीया नवनियुक्त अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी विजयानंतर दिली.