विद्यानिधी संकुलात भरली विठ्ठल नामाची शाळा…

मुंबई : जुहूच्या विद्यानिधी संकुलात विठुराया आणि आषाढीचं महत्त्व शाळांमधील चिमुकल्यांना समजावं आणि पर्यावरण जागृतीचा संस्कार मुलांच्या संवेदनशील मनावर रुजवावा, या उद्देशानं विद्यानिधी व्रजलाल पारेख मराठी माध्यमिक विभागामध्ये आज आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.आषाढी एकादशी सोहळ्याची सुरुवात राज्याचे सेवा आणि विक्रीकर विभागाचे निवृत्त सहआयुक्त सुनील सांगळे आणि विशेष अतिथी डॉ.राजेश्वरीू त्रिवेदी यांच्या हस्ते दिंडी पूजनानं करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र राज्य मंडळ खादी ग्रामोद्योग अधिकारी आनंद कर्णिक,न्यू इंडिया अश्युरन्स अधिकारी कैलास कासे, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

शाळेतल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिपाठ सादर केला.तसंच चिमुकल्या वारकऱ्यांनी, अभंग, भारुड, नृत्यावर ताल धरला. वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी हाती टाळ घेत, चंद्रभागेच्या तीरी, विठ्ठल नामाची शाळा भरली… गीतं आणि मला पंढरीला नेलं ग बया हे भारुड सादर केलं.

विद्यार्थी वारकऱ्यांनी हातात विविध प्रबोधनपर घोषवाक्यांचे फलक घेऊन पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व सांगणाऱ्या घोषणा देत तुळशी रोपाची प्रतिकात्मक वृक्षदिंडी काढली. विद्यार्थ्यांनी टोपी, गळा तुळशी माळ, धोतर अशी वेशभूषा तर नऊवारी साडीत्या तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन निघालेल्या विद्यार्थिनीं हे आकर्षणाचं केंद्र होतं. शाळेच्या शिक्षकांनीही फेर धरून आणि फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला.

‘आपल्या शाळेत येऊन मला पंढरपूरच्या वारीला प्रत्यक्ष आल्यासारखं वाटलं आणि आठशे वर्ष जुनी वारीची परंपरा शाळेनं जपली आहे, अशी भावना राज्याचे सेवा आणि विक्रीकर विभागाचे निवृत्त सहआयुक्त सुनील सांगळे व्यक्त केली. ‘विठ्ठलाच्या भेटीसाठी दूर पंढरपूरला जाण्याची गरज नाही, तर आपली शाळा हेच पंढरपूर आहे,’ असं महाराष्ट्र राज्य मंडळ खादी ग्रामोद्योग अधिकारी आनंद कर्णिक यांनी सांगितलं.