बोरिवलीत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव राष्ट्रभक्तीच्या उत्साहात साजरा !

मुंबई : बोरिवलीत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेने राष्ट्रभक्तीच्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनाच्या प्रदर्शनाचे २८ मे २०२३ ला उद्धघाटन करण्यात आले. तसेच दिनांक २९ मे २०२३ ला देशभक्ती आणि वीर सावरकर गीत कार्यक्रम गुजराती ‘डायरो’च्या माध्यमातून सादर करण्यात आले. अत्यंत सृजनशील पद्धत, चाकोरी बाहेरील आयोजन, विद्युत रोषणाई, देशभक्तीची गीते, सावरकर अनुयायी आणि नागरिकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचे वातावरण राष्ट्रभक्तीने फुलले होते. यंदा प्रथमच स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनी सावरकरांची जीवनावली प्रदर्शन दृश्य स्वरूपात आणि चित्रफितीद्वारे दाखवण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर रचित गाण्यांनी वातावरण देशभक्तीमय झाले. चित्र प्रदर्शनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कुटुंब, जन्मस्थान आणि वास्तव्य, अंदमान तुरुंगाची प्रतिकृती, तुरुंगातील यातना याचे दालन लक्षवेधी होते. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य आणि काही दुर्मिळ वस्तू देखील प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. यावेळी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, आमदार सुनिल राणे, आमदार अतुल भातखळकर, आमदार मनीषा चौधरी, आमदार योगेश सागर, विधानपरिषद आमदार प्रविण दरेकर, पोईसर जिमखानाचे अध्यक्ष मुकेश भंडारी, मुंबई पदाधिकारी डॉक्टर योगेश दुबे,जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, नितीन प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते.

‘वीर सावरकर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक होते. देशाच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांनी केलेल्या अत्याचाराच्या इतिहासाने प्रक्षुब्ध होऊन त्यांनी बंधू गणेश सावरकर यांच्या मदतीने देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अभिनव भारत आंदोलन सुरु केले. सावरकर उत्तम वक्ते, लेखक आणि इतिहासकार होते. अंदमानच्या सेल्युलर जेल मध्ये अत्यंत शारीरिक हालअपेष्टा सहन करून देखील त्यांचे धैर्य डगमगले नाही. स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना कमी लेखले गेले. क्रांतिकारकांवरील ऐतिहासिक अन्याय दूर करून त्यांचा योग्य सन्मान केला पाहिजे. भावी पिढ्यांना सावरकरांचे योगदान कळावे यासाठी सावरकरांवर स्थायी प्रदर्शन करावे तसेच भगूर या सावरकरांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक उभारले जावे,’ असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.

‘मी सर्वप्रथम महामहीम राज्यपाल रमेश बैस यांचे आभार व्यक्त करून त्यांना धन्यवाद देतो. १८ वर्षाच्या कार्यकाळात मी स्वत: राजकारणात तिकीट नाकारूनही प्रभावीपणे सांगितले की, आपल्याला लढायचे आहे आणि उभे राहायचे. ते उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक. हेमेंद्र मेहता यांनी घरातून पकडून पक्षाच्या कामासाठी नेले. त्यामुळे मी खासदार म्हणून इथं उभा आहे. माझ्या संपूर्ण ४०-४२ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्या दिवसापासून जे सोबत होते ते आजही सोबत आहेत. त्याग, तपस्या आणि बलिदान ज्या पद्धतीने वीर सावरकरांनी दिले. त्याप्रमाणे पूर्वीच्या कार्यकर्त्यांनी वीर सावरकर उद्यान सांभाळले, त्यांचेही अभिनंदन.

वीर सावरकरांबद्दल एका ओळीत सांगायचे झाले आणि आजच्या वर्तमान काळात जे आपण पाहत आहोत. ते द्रष्टे होते. सावरकरांच्या मनातील एक विचार मला प्रभावित करतो, ‘बलशाली भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.’ आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या संस्कारातून वाढले आणि मोठे झाले. त्यांनी १८ वर्षापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचे उद्धघाटन केले. त्यांनी मला २००४ ला आलिंगन देऊन मिठी मारली होती आणि ती निवडणूक मी जिंकलो. आनंद होतो की, नवीन संसद भवनात त्यांच्या समोर मी बसलो होतो. एक सामान्य कार्यकर्ता किती पुढचा विचार करतो आणि ते वास्तवात आणतो. त्या सर्वांनी आज समाजासाठी काम करण्याची आवश्यकता आहे.’ अशा भावना खासदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केल्या. अतिशय सुंदर आणि नियोजनबध्द आयोजनबद्दल खासदार गोपाळ शेट्टी यांनी पोईसर जिमखाना आणि स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान समितीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त करताना गेल्या १८ वर्षाचा इतिहास आणि अनुभव कथन केले.

खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवलीतील सामाजिक, शैक्षणिक, संगीत,वैद्यकीय, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव आणि सन्मान करण्याची परंपरा या विषयी राज्यपाल महोदय यांनी गौरवोद्गार काढताना ही परंपरा सर्व संस्थांनी जपली पाहिजे असे सांगितले. या कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रात गेली ४० वर्षे सेवा देत असलेले आणि नाना पालकर संस्थेचे उपाध्यक्ष आणि विश्वस्त डॉक्टर परेश नवलकर, संगीत क्षेत्रात आंतरराष्ट्रीय किर्तीचे बासरीवादक पंडित रूपक कुलकर्णी, अपंग पुनर्वसनसाठी अहोरात्र काम करणाऱ्या सुधा वाघ,गिर्यारोहण विभागात हिमालयीन कामगिरी करणारे प्रसिद्ध उद्योगपती राजेश गाडगीळ यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच क्रीडा क्षेत्रातील मुंबई क्रिकेट संघात निवड झालेला प्रसाद पवार,मल्लखांब प्रशिक्षक आशिष देवल,राष्ट्रीय मल्लखांब निरंजन अमृते, टेबल टेनिसपटू जसं मोदी, धृती पंडित आदींचाही सत्कार करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न करणारे समितीचे पदाधिकारी अजयराज पुरोहित, नितीन प्रधान, करुणाकर शेट्टी, प्रकाश दळवी, जिल्हा महासचिव दिलीप पंडित,उपाध्यक्ष महेश राऊत,सचिव शरद साटम, दीपक पाटणेकर, राजेश भट,युवा नेता नैनेश शाह, मनन पारेख,सुनील मोहिते, प्रिती पाठारे, जयश्री पाटील, शलाका नागवेकर,संजय सकपाळ,शेखर आहिरे आदींची मोलाची मदत झाली. महोत्सवाचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान समिती आणि पोईसर जिमखाना यांच्या वतीने करण्यात आले होते.