‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाची झलक प्रेक्षक पसंतीला

मुंबई:श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते | यदंकसेविनी लेखा वर्तते कस्यनोपरि || अशी स्वतःची राजमुद्रा छत्रपती संभाजी महाराजांनी तयार केली होती. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः लिहिलेल्या या राजमुद्रेचा अर्थ असा की, शिवपुत्र श्री शंभूराजे यांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाशी शोभते. लोकांच्या कल्याणाकरिता तिचा अंमल सर्वत्र गाजणार आहे. स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजविणारे, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्वितीय व्यक्तिमत्व. धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या या महान योद्धयाचा इतिहास मराठी रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ हा भव्य ऐतिहासिकपट १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे. ए.ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

त्याआधीच चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ढोल-ताशांचा गजर, अभिनेता भूषण पाटील यांची छत्रपती संभाजी महाराज यांच्या वेशात दमदार एंट्री, छत्रपती संभाजीं महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या गाण्याचे नेत्रदीपक सादरीकरण, छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष, अशा उत्साहपूर्ण भारावलेल्या वातावरणात ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचा रोमांचकारी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास रुपेरी पडद्यावर जिवंत होणार आहे. काही तासांतच या ट्रेलरने कमाल केली आहे. या ट्रेलरचे हिट्स सातत्याने वाढत असून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती ट्रेलरला मिळाली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाची, शौर्याची, अजोड पराक्रमाची महती या साऱ्यांचा अनुभव देणारा हा चित्रपट नव्या पिढीला खूप काही शिकवणारा असेल, असा विश्वास दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केला.

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर,भूषण पाटील, रवी काळे, समीर धर्मधिकारी, राहुल देव, विक्रम गायकवाड, भूषण शिवतरे,अमित देशमुख, तृप्ती तोरडमल, ईशा केसकर, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, बिपीन सुर्वे, दीप्ती लेले, सचिन भिल्लारे आदि कलाकारांच्या भूमिका ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात आहेत. मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी ‘शिवरायांचा छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली असून कार्यकारी निर्माता प्रखर मोदी आहेत. कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए.फिल्म्स सांभाळत आहे.