दिल दोस्ती दिवानगी चित्रपटाचा दिमाखदार प्रिमियर !

मुंबई :‘दिल दोस्ती दिवानगी’ या चित्रपटाचा शानदार प्रीमियर सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. चित्रपटाच्या निर्मीती आणि दिग्दर्शनाचे मनापासून कौतुक करत चित्रपट पसंतीची पोचपावती मान्यवरांनी दिली. ‘उत्तम युथफूल थ्रिलरपट’ अशा शब्दात उपस्थितीतांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे.

कलाकारांच्या अप्रतिम अभिनय संगीता सोबतच दर्जेदार निर्मितीमूल्यांचा वापर आणि वेगात घडणाऱ्या घटना हे देखील ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. ट्रान्स इंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाची निर्मिती राजेंद्र राजन यांची असून शिरीष राणे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

काही अनपेक्षित घटनांमुळे बदलत जाणारे नात्याचे रंग आणि प्रेमाचा प्रवास कोणत्या वळणांनी घडत जातो याची रंजक कथा ‘दिल दोस्ती दिवानगी’ हा चित्रपट उलगडतो. कश्यप परुळेकर, वीणा जगताप, चिराग पाटील, स्मिता गोंदकर, अतुल कवठळकर, तीर्था मुरबाडकर, तपन आचार्य, दुर्वा साळोखे, कंवलप्रीत सिंग या नव्या दमाच्या तरुण कलाकारांची फळी यात पहायला मिळतेय. सोबत प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, स्मिता जयकर, विद्याधर जोशी, सुरेखा कुडची यांसारख्या अनुभवी आणि मात्तब्बर कलाकारांची साथ त्यांना मिळाली आहे.