पनवेल: ‘अंध असोत, दिव्यांग असोत, विविध आजारांगी ग्रस्त असोत अशा सगळ्या प्रकारच्या वंचितांना मदत करण्यात अनोखे सुख असते. साधूत्वाचा अंश आपल्यातही असल्याने आपण ते करत असतो व सामाजिक संस्था, मंदिरे ही शक्तीकेंद्रे असल्याने त्यांच्याकडूनही अशा प्रकारचे होणारे काम समाजाला आधारभूत ठरते’ असे प्रतिपादन निवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल बने यांनी नेरे, शांतिवन येथील ‘कुष्ठरोग निवारण समिती’च्या न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात केले. १ नोव्हेंबरला श्री गजानन महाराज भक्त मंडळ व युथ कौन्सिल, नेरुळ यांच्या संयुवत विद्यमाने तेथील कुष्ठरुग्णांना दिवाळीनिमित्त अन्नधान्य, गोडधोड व औषध वाटप आणि लेखक पत्रकार राजेंद्र घरत यांच्या ब्रेल लिपीतील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विचारमंचावर ‘कुष्ठरोग निवारण समिती’चे अध्यक्ष विधीज्ञ ॲड. प्रमोद ठाकूर, आर सी एफ विपणन विभागाचे कार्यपालन संचालक एम रमेश, रामकृष्ष्ण नेत्रालयचे विभागीय विक्री व्यवस्थापक अनुप दुलगजा तसेच प्रभाकर गुमास्ते, शिवाजी शिंदे, दीपक साळवणकर हेही उपस्थित होते.
यावेळी विठ्ठल बने यांच्या हस्ते लेखक पत्रकार राजेंद्र घरत यांच्या हे विरुध्द ते आणि जीवनसे भरी तेरी आँखे या ब्रेल लिपीतील दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ब्रेल लिपीमुळे अंधांना ज्ञानप्राप्ती शक्य झाल्याचे सांगून याहीपूर्वी आपल्या समाजात अनेक नेत्रहीन व्यक्ती विद्वान होत्या, त्यांनी श्रवणाने ज्ञान मिळवल्याचे बने यांनी सांगितले. या प्रसंगी बने यांचा दोन्ही संस्थांच्या वतीने त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक करिकीर्दीचा शाल, श्रीफल, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. लेखक राजेंद्र घरत यांनी आपल्या ८० टक्के जाणीवा या डोळ्यांशी संबंधित असल्याचे सांगतानाच ‘युथ कौन्सिल नेरुळ’ व ‘श्री गजानन महाराज भक्त मंडळा’चे सदस्य आता ज्येष्ठ होत गेल्याने नव्या पिढीच्या शिलेदारांनी समाजसेवेच्या क्षेत्राकडे वळले पाहिजे असे नमूद करताना युवा पिढीने वेतनाचे पॅकेज, मॉलमधील खरेदी, फार्म हाऊस भटकंतीसोबत सामाजिक ऋणातून उतराई होण्यासाठी अशा कार्यक्रमातून पुढे येण्याची अपेक्षा व्यक्त केली. ‘ज्येष्ठ नागरिक संघा’च्या रणजित दिक्षित यांच्या पुढाकाराने ‘रामकृष्ण नेत्रालया’कडून पर्यावरणपूरक अशा ज्यूटच्या १०० पिशव्यांचे वाटप यावेळी उपस्थितांना करण्यात आले.
या कार्यक्रमानंतर पार पडलेल्या ‘युथ कौन्सिल नेरुळ’ यांच्या ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२६ – २०२९ करिता नव्या कार्यकारिणीत जी आर पाटील हे अध्यक्ष, सुभाष हांडे देशमुख मुख्य सचिव व अशोक महाजन यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष हांडेदेशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवाजीराव शिंदे, दत्ताराम आंब्रे, रणजित दिक्षित, रवींद्र कांबळे, अंकुश शिंदे, दिलीप चिंचोळे, अशोक महाजन, रमेश सुर्वे, यशवंत गोणेवाड, जी आर पाटील, गोपाळ शिंदे यांनी परिश्रम घेतले.