कलाश्रम मुंबईचा अभियान सन्मान पुरस्कार प्रा.देवदत्त पाठक, अभिनेते मोहन साटम, गायिका अर्चना ठाकूर आणि पत्रकार विनोद साळवी यांना प्रदान…

मुंबई:’कलाश्रम मुंबईचा अभियान सन्मान पुरस्कार प्रा.देवदत्त पाठक, अभिनेते मोहन साटम, गायिका अर्चना ठाकूर आणि पत्रकार विनोद साळवी यांना दखलपत्र देऊन प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिक कै.परशुराम पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ पत्रकार आणि कलाकार नंदकुमार पाटील आणि नंदिनी पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा अभियान सन्मान दिवंगत सर्व प्रकारच्या क्षेत्रात विशेषतः कलेत सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना, त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रत्येक महिन्यात येणाऱ्या त्यांच्या पुण्यतिथी निमित्त देण्यात येतो. त्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात नाटककार विनोद हडप यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रा.देवदत्त पाठक यांना गायिका मंगल अनासपुरे यांच्या स्मृति प्रित्यर्थ गायिका अर्चना ठाकूर, तर अभिनेते अविनाश खर्शीकर यांच्या स्मृत्यर्थ मोहन साटम यांना, तर पत्रकार नितीन चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ पत्रकार विनोद साळवी यांना हा आगळावेगळा पुरस्कार मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि जेष्ठ पत्रकार संदीप चव्हाण यांच्या हस्ते दिला गेला.

यावेळी पत्रकारिता आणि कला सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्ती आणि दिवंगत व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्ती उपस्थित होत्या. अशा प्रकारचा पुरस्कार म्हणजे कला सामाजिक राजकीय पत्रकारिता या क्षेत्रातील व्यक्तींचे स्मरण आणि त्या निमित्ताने त्याच प्रकारच्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या कार्याला सलाम करणे, हे कलाश्रम गौरव पुरस्काराचे वेगळेपण आहे.

दिवंगतांना श्रद्धांजली याने कार्यक्रमाचा आरंभ आणि योग्यांची दिवाळी यावर आत्मबोध करणारे महंत अनंत दास यांचे कीर्तनाने समाप्ती असे या कार्यक्रमाचे हटके स्वरूप होते. गेल्या दहा वर्षात ८२ वेळेला प्रत्येक वेळी नवीन चार जणांना सन्मानित केले गेले, अशा प्रकारच्या पुरस्काराने अनेक नामवंत लोकांच्या सहभागाने आणि अखंडपणे कार्यरत असलेल्या दिग्गजांच्या सन्मानाने या कार्यक्रमाचा माहोलच एकदम आपुलकीचा आणि संवेदनशील होऊन गेला.

दिग्गज कार्य करणाऱ्या कैलासवासी असामान्य व्यक्तींचे स्मरण आणि त्यातून नवोदिकांना कार्यक्रमाचे स्वरूप सादर करण्याची संधी अशा भावनेतून आम्ही हा अभियान सन्मान उपक्रम करत आहोत असे प्रतिपादन या पुरस्कार संकल्पनेचे सर्वेसर्वा नंदकुमार पाटील आणि नंदिनी पाटील यांनी यानिमित्ताने केले. केवळ आणि केवळ आपुलकी आत्मीयता आणि ओसंडून वाहणारा आदर ,या निमित्ताने पहिल्यांदाच अनुभवला आणि आपल्या आजूबाजूच्या अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना ओळखत त्यांचा सन्मान कसा करावा असा आदर्श या कलाग्राम च्या अभिनय सन्मान पुरस्काराने मला मिळाला आहे, असे प्रतिपादन मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि जेष्ठ पत्रकार संदीप पाटील यांनी या निमित्ताने केले.

कलाश्रम हे एक कुटुंब वत्सल कार्य करणारी आणि सामाजिक जाणीवांचे पालकत्व स्वीकारणारी संस्था नाही तर कुटुंब आहे असे मत यानिमित्ताने ज्येष्ठ नाट्य गुरु स्कूलचे संस्थापक प्रा.देवदत्त पाठक यांनी यानिमित्ताने केले. मोहन साटम यांनी अशा उत्तरायणामध्ये सुद्धा आमच्यासारख्यांची जाणीव ठेवणारी कलाश्रम ही सपोर्ट सिस्टीम आहे असे म्हटले, तर गायिका अर्चना ठाकूर यांनी आपुलकीची भावना ही अध्यात्म ने दिली आहे जी संगीतात आहे, त्या संगीताचा आशीर्वाद मला या निमित्ताने मिळाला असे प्रतिपादन केले, तर विनोद साळवी यांनी पत्रकारितेमध्ये असलेली तत्परता, सत्यता आणि शुद्धता हे सर्व जपण्याचे बळ या पुरस्काराने मला मिळाले आहे, असे नमूद केले.

या कार्यक्रमाला पत्रकार उमेश घळसासी, लीला हडप, अंबर हडप, खर्शीकर,ऋषिकेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.