नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा अनोखा कानमंत्र

मुंबई : सध्या चला फिरूया.. हसूया.. जगूया.. म्हणत, नाना पाटेकर एका धम्माल सहलीला निघालेत. हा प्रवास सिद्धार्थ आणि सायलीसोबत चालू आहेच पण यात मकरंद अनासपुरे सुद्धा त्यांच्या साथीला आहेत. दिग्गज कलाकारांची मैत्री आपल्याला चित्रपटाच्या प्रवासात पहिल्यांदाच एकत्र पाहता येणार आहे. बऱ्याच वर्षानंतर ही कलंदर जोडी ‘ओले आले’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. आपल्या अभिनयाचे आणि विनोदाचे चौकार आणि षट्कार मारायला नाना आणि मकरंद अनासपुरे सज्ज असून कोकोनट मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘ओले आले’ हा चित्रपट नववर्षात म्हणजे ५ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘ओले आले’ चित्रपटात ‘व्यस्त रहा.. पण मस्त रहा..’ असं म्हणणारे नाना सिद्धार्थला जगण्याचे सूत्र सांगताना दिसताहेत. खरं तर हा मूलमंत्र ते स्वतःच्या दैनंदिन व्यवहारातून, कधी प्रेमाने तर कधी हट्टाने मुलाला शिकवू पाहताहेत. बाबा आणि मुलाच्या या मजेशीर जुगलबंदीमध्ये मकरंद अनासपुरे देखील सामील झालेले दिसणार आहेत. आपलं आयुष्य आनंदी, समाधानी असावं असं म्हणणारे मकरंद अनासपुरे या कुटुंबाचा महत्त्वाचा घटक झालेले आहेत.

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंची ही मजेशीर जोडगोळी ‘ओले आले’ मधून आपल्याला नक्कीच मनसोक्त हसवेल यात काही शंका नाही पण हा चित्रपट आपल्याला जगण्याचा एक अनोखा कानमंत्र सुद्धा देईल हे नक्की.