यु.आर.एल फाउंडेशनचा सामाजिक गौरव पुरस्कार सोहळा संपन्न !

मुंबई : यु.आर.एल फाउंडेशनचे अध्यक्ष उदयदादा लाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत यु.आर.एल फाउंडेशनतर्फे दरवर्षी सामाजिक गौरव पुरस्कार सोहळा साजरा करण्यात येतो. यंदाचा २०२३चा सामाजिक गौरव पुरस्कार सोहळा नुकताच दिमाखात संपन्न झाला. समाजासाठी दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल डॉ.शैलेश श्रीखंडे (प्रसिद्ध कर्करोग तज्ञ), डॉ. प्रीतम सामंत (प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ), डॉ. अमोल भिंगार्डे (जनरल फिजिशियन) आणि अभिनेते सयाजी शिंदे (कलाकार आणि वृक्षप्रेमी) आदी मान्यवरांना डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल-श्रीफळ आणि रुपये एक लाख रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यासोबत अ.नि.स.चे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सातारा यांना रुपये १ लाखाचा पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला.

चांगल्या कार्यक्रमाचा भाग होता आल्याचा आनंद या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केला. पुरस्काराचा आनंद व्यक्त करताना अशा पुरस्कारांनी शाबासकीची जी थाप आपल्या पाठीवर पडते ती अजून चांगले काम करण्यासाठी खूप प्रेरणादायी ठरते’ अशी भावना सर्व सन्मानित मान्यवरांनी बोलून दाखविली.‘प्रेमाचा झांगडगुत्ता’, ‘दाभोळकर को कयों मारा’, ‘बाई फुफाटा’, ‘या मुलींना सारं कळतं’, ‘पांढरे कावळे’, ‘पुढे पुढे दिवस’, ‘नुसतेच दिवे जळतात’ यासारख्या बहारदार कवितांचा सुरेख नजराणा सादर करत रामदास फुटाणे, अशोक नायगांवकर, अरुण म्हात्रे, साहेबराव ठाणगे, महेश केळुस्कर, नारायण पुरी (नांदेड), गुंजन पाटील (औरंगाबाद),भरत दौंडकर (शिरुर) आदी कवींच्या कवितांनी उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच संवादाच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांनी आपला कार्यप्रवास यावेळी उलगडला.

आपले ८१ व्या वर्षात पदार्पण आणि यु.आर.एल फाउंडेशनची २१ वर्ष असा प्रवास उलगडताना उदयदादा लाड यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘ या ८० वर्षाच्या वाटचालीत मला अनेक चांगले स्नेही मिळाले त्यांनी मला प्रोत्साहन, दिलं, उपदेश देत जगण्याचा मार्ग दाखविला.आपले चेहरे न दाखविता अनेक जण खूप चांगली कामे करीत असतात अशा मान्यवरांचा सन्मान करायला मिळणं हे आमचं भाग्य आहे. समाजासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्याची संधी यु.आर.एल फाऊंडेशनला मिळाली हा आमचा देखील गौरव आहे.’ यु.आर.एल फाउंडेशनचे अध्यक्ष उदयदादा लाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.