विद्यानिधी मराठी माध्यमात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न!

मुंबई : उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी मराठी माध्यमिक विभागात सोमवार, ३ जूलै २०२३ ला दहावीच्या विद्यार्थ्यांनी परिपाठामध्ये गुरुपौर्णिमा साजरी केली. यासाठी वर्गशिक्षिका अनुजा थोरात यांचे सक्षम मार्गदर्शन लाभले. गुरुपौर्णिमा कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या दादर बालमोहन विद्यामंदिरच्या निवृत्त मुख्याध्यापिका विजया चौधरी आणि विशेष अतिथी विद्यानिधी इंग्रजी माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका आरती अध्यापक लाभल्या होत्या.

गुरूपौर्णिमेचे दिनविशेष, माहिती, कथा, गीत, नृत्याविष्कार,अभंग,मनोगत आदीतून विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचे शाळेवरील प्रेम आणि गुरुंविषयी असणारी आस्था प्रकट केली. शिवरायांचे गुरु श्री रामदास स्वामी यांच्या कथेतून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला. विजया चौधरी यांनी विद्यार्थ्यांना पौराणिक, ऐतिहासिक कथांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. जीवन जगत असताना प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे, तो अंगी बाळगून आदर्श नागरिक बनून खूप मोठे व्हा. असा सल्ला दिला.विद्यार्थ्यांचे प्रेम आणि आदर हाच गुरुचा बँक बॅलन्स असतो. आई,वडील, शिक्षक हे आपले गुरु असतातच. पण त्याचबरोबर निसर्गही आपला गुरु असून, तो आपल्याला खूप काही शिकवत असतो. त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे.असे त्या आपल्या मार्गदर्शन पर भाषणात म्हणाल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका निलम प्रभू यांनी डॉ. अब्दुल कलाम आणि त्यांचे गुरु डॉक्टर सतीश धवन यांची आठवण सांगत अपयशाच श्रेय गुरू घेत असतो आणि यशाच्या वेळी गुरु शिष्याला श्रेय देतो. हे सांगून गुरु आणि शिष्यांचे नातं कसं असतं ते पटवून दिले.

विशेष अतिथी आरती अध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे प्रेम आणि आदर हीच आमची सर्वात मोठी भेट असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे आभार मैराळे सरांनी व्यक्त करत विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात घेतलेला सहभाग हीच गुरूदक्षिणा आहे असे म्हणून विद्यार्थ्यांच कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून जमा केलेले पैसे समर्पण कलशात दान केले. ज्या पैशांचा उपयोग गरजूंसाठी केला जाणार आहे.