स्वातंत्र्य दिनी राष्ट्रीय खादी ग्रामोद्योग आयोगाच्या स्पर्धेत विद्यानिधीच्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मान!

मुंबई: ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय खादी ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेत जुहू येथील विद्यानिधी शैक्षणिक संकुल (एज्युकेशनल कॉम्प्लेक्स) मराठी माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. ‘मेरा भारत महान है क्योंकि…’ या विषयांवर आपली मते मांडून विद्यार्थ्यांनी बक्षिसे पटकावली. ही बक्षिसे राष्ट्रीय खादी ग्रामोद्योगचे कार्यकारी अध्यक्ष मनोजकुमार गोयल यांच्या हस्ते मुंबईतील खादी ग्रामोद्योग भवन येथे प्रदान करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी कर्तव्य आणि जबाबदारी या विषयावर प्रभावी भाषणे सादर केली. देशभक्तीचा संदेश देणारी छोटी नाटिका आणि देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली. त्याचबरोबर खादीच्या कपड्यापासूनच महात्मा गांधी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नवीन दिशा दाखवली, याचा संदेश देणारी लघूनाटिका इंग्रजी भाषेत यावेळी विद्यार्थ्यांनी सादर करून. सर्वांना पुन्हा खादीचा वापर करण्याचा संदेश दिला.

या कार्यक्रमात सहभागी बालचमूंना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये खादी व ग्रामोद्योगाविषयी जागरूकता निर्माण झाली तसेच सेवाभाव वाढीस लागला. अशा राष्ट्रीय उपक्रमांमधील सहभागामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून संस्थेची प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे.