भा.ज.प. प्रदेश गुरुपौर्णिमा उत्सव समिती
नाशिक: भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश गुरुपौर्णिमा समितीतर्फे ‘विश्वगुरू भारत’ संकल्पनेवर आधारित राज्यस्तरीय भव्य रांगोळी स्पर्धेचे ३ सप्टेंबरला आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गुरुपौर्णिमा उत्सव समितीचे प्रदेश संयोजक लक्ष्मण सावजी यांनी दिली. त्र्यंबक मार्गावरील ठक्कर डोम येथे ही स्पर्धा होणार आहे. त्यानंतर चार ते सहा सप्टेंबरपर्यंत रांगोळी प्रदर्शन जनतेसाठी खुले राहणार आहे.
भारतीय संस्कृती, परंपरा, अध्यात्म, ज्ञानपरंपरा आणि भारताच्या गौरवशाली इतिहासाचे कलात्मक दर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून घडविण्यात येणार आहे. राज्यभरातील कलाकार व रंगावलीप्रेमींना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार असून, ‘विश्वगुरू भारत’ ही संकल्पना विविध कलाविष्कारांतून साकारली जाणार आहे, अशी माहिती लक्ष्मण सावजी यांनी दिली.
रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन ४ सप्टेंबरला सकाळी ११:०० वाजता होणार आहे. त्यानंतर दिनांक ४, ५ व ६ सप्टेंबर या तीन दिवसांत सकाळी १०:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत रांगोळी प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहील. भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेपासून आधुनिक भारताच्या प्रगतीपर्यंतचा प्रवास रंगांच्या माध्यमातून साकारण्याचा हा उपक्रम आहे.
या रांगोळी स्पर्धेत इयत्ता ५ वी ते १० वी आणि इयत्ता ११ वीपासून पुढील खुल्या गटातील स्पर्धकांना सहभागी होता येईल. स्पर्धेसाठी भारतीय गुरुशिष्य परंपरा, भारताची संरक्षण सिद्धता, भारतीय अस्मितेचे मानबिंदू, आत्मनिर्भर भारतासाठी पंचपरिवर्तन आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा महामंत्र–‘वंदे मातरम्’ हे विषय देण्यात आले आहेत. स्पर्धेतील सहभागींसाठी प्रवेश विनामूल्य असून, स्पर्धकांनी दिलेल्या विषयांपैकी एका विषयावरच रांगोळी साकारायची आहे.
प्रत्येक स्पर्धकाला ४ बाय ४ फूट आकाराची जागा उपलब्ध करून दिली जाणार असून, रांगोळी रेखाटण्यासाठी तीन तासांचा कालावधी असेल. रांगोळीसाठी यांत्रिक टूल्सचा वापर करता येणार नसून, स्पर्धेसाठी लागणारे सर्व साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणायचे आहे. निर्धारित वेळेत पूर्ण झालेल्या रांगोळीचेच परीक्षण केले जाईल आणि परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
बक्षिसे
इयत्ता ५ वी ते १० वी गटासाठी प्रथम क्रमांकाला ११,००० रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय ७,००० रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय ५,००० रुपये व सन्मानचिन्ह, तर उत्तेजनार्थ २,००० रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. इयत्ता ११ वीपासून पुढील खुल्या गटात प्रथम क्रमांकासाठी २१,००० रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय ११,००० रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय ७,००० रुपये व सन्मानचिन्ह, तर उत्तेजनार्थ ३,००० रुपये व सन्मानचिन्ह अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या राज्यस्तरीय भव्य आयोजनात प्रदेश समितीचे सहसंयोजक नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर, आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके, डॉ .भारती पवार, अॕड.माधवी नाईक, रोहिणी नायडू, आमदार मंगेश चव्हाण , बाळासाहेब सानप, विजय साने, ज्येष्ठ रांगोळी कलाकार निलेश देशपांडे, आमदार प्रा.देवयानी फरांदे, सीमा हिरे, आमदार अॕड.राहुल ढिकले, सुनिल केदार, गणेश गिते,आ.गोकुळ गिते, निलेश बोरा, मच्छिंद्र सानप, विपुल मेहता यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व प्रमुख कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. अधिक माहितीसाठी ७५८८१७९६४२ / ९४२२२५५८५१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.