तुळशीच्या माळा गळा…विठ्ठल भक्तांना पर्यावरणाचा लळा !

मुंबई : “आषाढी एकादशीच्या निमिताने पंचमहाभूते फाउंडेशनच्या वतीने पांडुरंगाला अत्यंत प्रिय असलेल्या तुळशीच्या रोपांचे वाटप परळ येथील विठ्ठल मंदिर परिसरात करण्यात आले. या पर्यावरणस्नेही उपक्रमामध्ये बोरीवली, सायन, दादर, प्रभादेवी, नायगाव, वरळी, धारावी येथील स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. ‘प्रत्येकाने किमान एक झाड लावावे आणि जगवावे!’ या उपक्रमासंदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी फाउंडेशनने तुळशी रोप वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विठ्ठलभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.”

‘पंचमहाभूते फाउंडेशन’ ही स्वयंसेवी संस्था (एनजीओ) संपूर्ण चराचरात समाविष्ट असलेल्या जमीन, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या जतन आणि संवर्धनासाठी कटिबद्ध आहे. वृक्ष लागवड, मिनी फॉरेस्ट, नेल फ्री ट्री, पर्क्युलेशन पिट्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग यासोबतच “नो बाथ डे“, “टू मिनिट शॉवर”, “पर्यावरण विघ्नहर्ता” आणि “से नो टू प्लॅस्टिक वॉटर बॉटल” यासारख्या अभिनव कल्पना एनजीओ सातत्याने राबवत आहे. “सोल्युशन्स फॉर पॉल्युशन” हे ब्रीदवाक्य घेऊन जगभरातील पर्यावरणप्रेमी व्यक्ती आणि संस्था यांना या कार्यात सामावून घेण्यासाठी पंचमहाभूते विशेष प्रयत्नशील आहे.

सर्वसामान्य जनतेला आपल्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभागी करुन घेणे, हा फाउंडेशनचा आग्रह असतो. अत्यंत सोप्या पद्धतीने सामान्य नागरिकही सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवू शकतील, असा फाऊंडेशनचा प्रयत्न असतो. या आषाढी एकादशीच्या निमिताने पंचमहाभूते फाउंडेशनच्या वतीने पांडुरंगाला अत्यंत प्रिय असलेल्या तुळशीच्या रोपांचे वाटप परळ येथील विठ्ठल मंदिर परिसरात करण्यात आले. विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.

पंचमहाभूते फाउंडेशन लोकांची नाळ ओळखून समाजविधायक कामे हाती घेते आणि म्हणूनच अशा पर्यावरणविषयक कार्यक्रमांना जनतेचाही सकारात्मक प्रतिसाद लाभतो. एनजीओ अनेक वर्षांपासून विविध ठिकाणी तुळशी रोपांचे वाटप करत आहे.“प्रत्येकाने वर्षाला एक झाड लावले तर दरवर्षी लाखो झाडे लावली जातील आणि त्यांची जोपासनादेखील केली जाईल.”, या विचाराला पृष्टी देण्यासाठी हा तुळशी रोप वाटप कार्यक्रम हाती घेण्यात येतो. आपण परमेश्वराची भक्ती करतो. आपली त्याच्यावर नितांत श्रद्धा असते. तशीच श्रद्धा आपण निसर्गावरही ठेवायला हवी. वृक्ष लागवडीच्या माध्यमातून त्याचीही भक्ती करायला हवी. हा संदेश या आषाढी एकादशीच्या कार्यक्रमातून एनजीओने दिलेला आहे.

नागरिकांना अशा विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करुन दिल्यामुळे ते निसर्गाचे जतन, संरक्षण आणि संवर्धन यासाठीही कटिबद्ध होतील. समजून उमजून पर्यावरण संरक्षणासाठी योगदान देऊ करतील, असा पंचमहाभूते फाउंडेशनचा ठाम विश्वास आहे.