मुंबई: लग्न म्हणलं की नातेवाईक आणि समाज यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मोठा सहभाग असतोच. मानपान, रूसवे फुगवे, दिखावे आणि देखाव्यांचा कार्यक्रम साहजिकच आहे, पण जर का खरं खरं झालेलं लग्न खोटा खोटा दिखावा असला तर? फेक मॅरेज मधील जर तरच्या धमाल गोष्टीत बऱ्याच कमाल घटना घडणार आहेत. ‘६ नोव्हेंबर २०२३’ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर या चित्रपटाचा ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ होणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतंत्र (सवि) गोयल यांनी केले असून नेहा महाजन आणि भूषण प्रधान यांची सुपरहिट जोडी प्रेक्षकांना चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा अवनी (नेहा महाजन) आणि तिच्या कलेक्टर होण्याच्या स्वप्नाभोवती फिरते. आपलं स्वप्न मुंबईला जाऊन पूर्ण होऊ शकेल म्हणून तिला आलेल्या स्थळाला तिचा होकार येतो आणि तिचा स्वप्नांचा पाठलाग सुरू होतो. स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल तिच्या आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात. अवनी तिचं स्वप्न साकार करेल की नाही? हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
“तरुणांची स्वप्न आणि त्यांचं त्या स्वप्नांमागे बेभान होऊन धावणं या चित्रपटात प्रखरपणे चित्रित केले आहे.’फेक मॅरेज’ याची कथा उपदेशक असून यासारखे अनेक चित्रपट भारताच्या भविष्याला म्हणजेच आजच्या तरुणांना आपलं ध्येय साधण्यासाठी मनोरंजनासोबतच एक प्रेरणा म्हणून ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीच्या माध्यमातून प्रदर्शित करणार आहोत.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.