राजेंद्र घरत यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा कृतज्ञता पुरस्कार प्रदान !

नवी मुंबई : पत्रकार आणि गेली चोवीस वर्षै मुशाफिरी ही लेखमाला चालवणारे स्तंभलेखक राजेंद्र घरत यांना यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या नवी मुंबई केंद्राचा सन २०२३ साठीचा पत्रकारिता पुरस्कार महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष, माजी गृहमंत्री आणि विद्यमान आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. १० जून रोजी नेरुळ येथील स्टर्लिंग महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी विचारमंचावर यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले, नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड, सचिव डॉ अशोक पाटील, कोषाध्यक्ष भाऊसाहेब शिंगाडे उपस्थित होते.

गेली अठ्ठावीस वर्षे पत्रकारितेत सक्रिय असलेल्या घरत यांनी अंधश्रध्दा निर्मुलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण रक्षण, उपेक्षित महिला-विधवा-परित्यक्ता, अंधशाळेतील विद्यार्थी, कुष्ठरोगी, ज्येष्ठ नागरिक यांच्याबाबतचे विचार केंद्रस्थानी ठेवून सातत्याने लेखन केले असून त्यांची ब्रेल लिपीमध्ये वीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि आणखी पाच ब्रेल पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. यापूर्वीही त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. सदर पुरस्कार वितरण प्रसंगी दिलीप वळसे-पाटील यांनी केलेल्या भाषणात यशवंतराव चव्हाण यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येऊन चांगले राजकारण तर केलेच; पण पारतंत्र्यात असल्यापासून देशसेवेत व्यस्त राहिले आणि पं. जवाहरलाल नेहरु यांच्या निर्वाणानंतर तत्कालिन काँग्रेसीं धुरीणांनी यशवंतराव यांनी देशाची धुरा सांभाळावी असे सांगितले असतानाही त्यांनी त्यावर निर्णय घेण्याची जबाबदारी इंदिराजींकडे देत चालून आलेल्या सर्वोच्च संधीपासूनही यशवंराव अलगद बाजूला झाले असे नमूद केले. यशवंतराव सेंटरच्या यापुढील कार्यक्रमात त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे दालनही सुरु करा, जेणेकरुन प्रेक्षकांना ती पुस्तके उपलब्ध होतील अशी सुचनाही वळसे-पाटील यांनी केली.

या प्रसंगी अस्मिता स्पेशल स्कूल, यशोदा महिला मंडळ, जिजामाता ट्रस्ट या संस्था तसेच आण्णासाहेब टेकाळे, रणजित बार्शीकर, अशोक पालवे, डॉ. सुहास पाबळकर, कांतीलाल कडू, सुरेखा पाटील यांनाही त्यांच्या लक्षवेधी योगदानाबद्दल सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. सत्कारमूर्तींच्या वतीने अण्णासाहेब टेकाळे व डॉ. सुहास पाबळकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमोद कर्नाड यांनी प्रास्ताविकातून सेंटरच्या नवी मुंबई केंद्राच्या कार्याची माहिती दिली. डॉ. अशोक पाटील यांनी आभारप्रदर्शन केले. अमरजा चव्हाण यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी नेटकेपणाने सांभाळली.